लोकसत्ता टीम

बुलढाणा: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १९ जानेवारीला रेल्वे रोकोची घोषणा करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर हे भूमिगत झाले! त्यामुळे रविकांत तुपकर यांना ताब्यात घेण्याचे पोलिसांचे संभाव्य मनसुबे उधळल्या गेले असून सध्या रविकांत तुपकर यांच्या निवासस्थानी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सोयाबीन, कापसाच्या दरवाढीसह इतर मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष कायम असल्याने मलकापूर येथे उद्या, शुक्रवारी रेल्वे रोको आंदोलनाची घोषणा रविकांत तुपकर यांनी केली होती. मुंबई, दिल्ली व गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे रोखणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी जाहीर केले. दरम्यान, शेगाव लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ मगरे यांनी काल, बुधवारी रविकांत तुपकर यांची भेट घेतली. त्यांनी ‘सीआरपीसी’ कलम १४९ नुसार तुपकरांना नोटीस बजावली. रेल्वे वाहतुकीस अडथळा, प्रवाशांच्या जीवास धोका अथवा रेल्वेच्या संपत्तीचे नुकसान झाल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

आणखी वाचा-नॅशनल जिओग्राफिक चॅनलची चिमुरडी कलाकार चार्वी आता झळकली इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या नोटीसवर सही करणारे रविकांत तुपकर भूमिगत झाल्याचे आज गुरुवारी निष्पन्न झाले. पोलिसांकडून अटकाव होण्याची कुणकुण लागताच रविकांत तुपकर भूमिगत झाले आहेत. पोलीस रविकांत तुपकर यांचा कसून शोध घेत आहेत. बुलडाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्या निवासस्थानी बंदोबस्त तैनात केला आहे.