चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात सम्राट लॉनमधील सभागृहात रमी क्लबच्या नावाने जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी मिळवून राज्यस्तरीय जुगार अड्डा सुरू करण्यात आला. स्थानिक नागरिक, महिला मंडळे आणि विद्यार्थ्यांनी जुगार अड्ड्याला विरोध दर्शविला. त्यामुळे पोलिसांनी छापा घालून जुगार अड्डा नष्ट केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रमी क्लबची परवानगीही रद्द केली. परंतु, काही महिन्यातच जुगार अड्ड्याचा संचालक ऐटलावर याच्या आर्थिक खेळीमुळे ज्या प्रशासकीय अधिकाऱ्याने परवानगी रद्द केली, तर त्याच अधिकाऱ्याने पुन्हा परवानगी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू राज्यात पोलिसांनी भरविणारे आणि खेळणारे यांच्यावर कडक कारवाई करणे सुरू केली. त्यामुळे तीनही राज्यातील जुगार खेळणाऱ्यांनी महाराष्ट्रात जाशा शोधली. तीनही राज्यात वट असलेल्या ऐटलावार याला हाताशी धरून सम्राट बहुद्देशिय संस्थेच्या नावाखाली रमी क्लबच्या नावावर परवानगी मिळवली. त्याने जुगार अड्डा सुरू करण्यासाठी आर्थिक तंत्र वापरले. पाण्यासारखा पैसा ओतून राजुरा ठाणेदारापासून ते थेट विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयापर्यंत जाळे विनले. त्यानंतर त्याने सम्राट लॉनमधील टोलेजंग सभागृहात जुगार खेळणाऱ्यांची सोय केली. राजुऱ्यात तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू राज्यातील मोठमोठे व्यापारी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी येऊ लागले.

त्यामुळे गावातील वातावरण बदलले. अनेकांचे पाय त्या जुगार अड्ड्यांकडे वळायला लागले. हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी राजुऱ्याचे माजी आमदार संजय धोटे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यांनी युवा पीढीचे भविष्य वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन राजुऱ्यातील सम्राट लॉनमधील जुगार अड्ड्याची माहिती दिली. देशमुख यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे पोलिसांनी तेथे छापे घालून जुगार अड्डा बंद पाडला. या क्लबचा अहवाल मागविण्यात आला. तेव्हा पोलीस विभागाने नकारात्मक अहवाल पाठविल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या क्लबचा परवाना रद्द केला. परंतु, पुन्हा काही दिवसांतच परवाना रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपलाच निर्णय फिरवला व हा अवैध अड्डा पुन्हा सुरू झाला. ज्या अधिकाऱ्यांनी परवाना निलंबित किंवा रद्द केला असेल, तो अधिकारी आपला निर्णय फिरवू शकत नाही, त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करावे लागते. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी किंवा न्यायालय त्यावर निर्णय देऊ शकते.

मुंबईतील पोर्टल संचालकाचा हस्तक्षेप

ऐटलावार याच्या सम्राट सभागृहात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा पडू नये म्हणून मुंबईत एका पोर्टलच्या संचालकाचा ‘मध्यस्थ’ म्हणून वापर करण्यात येत आहे. कारवाई न होण्यासाठी पोलिसांकडून संरक्षण मिळविण्याकरिता पोर्टल संचालकाने मध्यस्थी केल्यामुळे हा जुगार अड्डा बिनधास्तपणे सुरू असल्याची चर्चा आहे.

समाजमाध्यमांवर छायाचित्र प्रसारित

चंद्रपूर-राजुऱ्यातील जुगार अड्ड्यावर महाराष्ट्र पोलीस कारवाई करीत नसल्यामुळे नुकताच तेलंगणा पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात तेलंगणा, आंध्रप्रदेशातील मोठमोठ्या व्यापाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. तेलंगणा पोलिसांनी केलेल्या कारवाईत लाखोंची रक्कम, महागड्या कार, दारू जप्त करण्यात आली. त्या कारवाईचे छायाचित्र प्रसारमाध्यमांवर वेगाने प्रसारित झाले.

याबाबत विचारणा करण्यासाठी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांना भ्रमणध्वणी केला तसेच संदेशही पाठवले. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Re licensing of suspended rummy clubs amy
First published on: 14-08-2022 at 14:31 IST