अमरावती : खरीप हंगामात लागवड होणाऱ्या मका पिकाची पश्चिम विदर्भात विक्रमी लागवड झाली आहे. सर्वसाधारण ४५ हजार ४६२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यंदा सुमारे ९४ हजार ५०२ हेक्टरवर मका क्षेत्र पोहचले असून, त्यामध्ये ९९ टक्के वाटा हा अमरावती आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यांचा आहे.
पश्चिम विदर्भात अमरावती आणि बुलढाणा हे दोन जिल्हे मक्याचे हब म्हणून ओळखले जातात. या दोन्ही जिल्ह्यांसह अमरावती विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये तीनही हंगामात मका पीक घेतले जाते. अमरावती विभागात मक्याचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ४५ हजार ४६२ हेक्टर इतके आहे. त्या तुलनेत सुमारे ९४ हजार ५०२ हेक्टरमध्ये म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या २०८ टक्के क्षेत्रावर मक्याची लागवड झाली आहे. यामध्ये विक्रमी सर्वाधिक ५० हजार ५७० हेक्टर क्षेत्रावर एकट्या बुलढाणा जिल्ह्यात लागवड झाली आहे. अलीकडच्या चार-पाच वर्षांतील ही सर्वाधिक लागवड आहे.
सोयाबीन, कपाशी आणि तूर ही पश्चिम विदर्भातील प्रमुख पिके मानली जातात. त्यापैकी सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून उत्पादन खर्चाला परवडणारे दर न मिळणे आणि उत्पादनात वाढ किंवा सातत्य न राहणे हे दोन प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत. कपाशीत वेचणीचे दर आणि मजुरांचा प्रश्न मोठा आहे. या दोन्ही पिकांच्या तुलनेत गेल्या दोन-तीन वर्षांपासून मक्याचे दर मात्र स्थिर व टिकून असल्याची स्थिती आहे. मक्याची उत्पादकताही चांगली असून सरासरी ३० ते ४० क्विंटलपर्यंत हेक्टरी मका उत्पादन होते.
दर टिकून राहण्यामागे कुक्कुट खाद्य, मुरघास, स्टार्च आणि इथेनॉल यासाठी मक्याचा वापर वाढल्याचे कारण सांगितले जाते. मक्याच्या दाण्यापासून रोजच्या वापरासाठी पशुखाद्यासाठी ५०० हून अधिक प्रकारची उत्पादने बनविली जातात. कोंबड्यांच्या खाद्यामध्ये मक्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
बुलढाणा जिल्ह्यात मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र २३ हजार ९९६ हेक्टर इतके आहे. यंदा आतापर्यंत ५० हजार ५७० हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या २११ टक्के क्षेत्रात मका पिकाची लागवड झाली आहे. अमरावती जिल्ह्यात सरासरी २० हजार ६९९ हेक्टरच्या तुलनेत ४३ हजार ४३३ हेक्टर (२१० टक्के) क्षेत्रात मक्याचा पेरा आटोपला आहे. अकोला, वाशीम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मक्याला अजून पसंती दिलेली नाही. अकोला जिल्ह्यात केवळ ९७ हेक्टर, वाशीम ३१ हेक्टर आणि यवतमाळ जिल्ह्यात ३७२ हेक्टरमध्ये मका लागवड झाली आहे.