महेश बोकडे

नागपूर : राज्याच्या विविध भागात ९ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा दर्जा उंचावून तेथे नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालय करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी नवीन १२ प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची वाढीव पदेही नवीन आकृतिबंधात घेण्यात आली आहेत.

राज्यात १५ प्रादेशिक परिवहन कायार्लये आहेत. त्यामुळे या कार्यालयांसह परिवहन आयुक्त कार्यालयात पूर्वीच्या गरजेनुसार १ असे एकूण १६ प्रादेशिक परिवहन अधिकारी या संवर्गातील पदे मंजूर आहेत. त्यातील ८ अधिकारी सध्या विविध कार्यालयांत कार्यरत आहेत. तर इतर ८ पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. त्यामुळे हे अधिकारी नसलेल्या कार्यालयातील पदभार तेथील अथवा जवळपासच्या जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देऊन वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न परिवहन खात्याकडून होत आहे.

नुकतेच परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील पिंपरी चिंचवड, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, पालघर, चंद्रपूर, अकोला, बोरीवली, सातारा या नऊ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाढते कामकाज व महसूल बघता येथील कार्यालयाचा दर्जा वाढवून येथे नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालय प्रस्तावित केले आहे. त्यासाठी परिवहन खात्याच्या नवीन आकृतिबंधात प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची पदे १६ वरून वाढवून २८ करण्याचे प्रस्तावित केले आहे. या आकृतिबंधाला परिवहन खात्याच्या उच्चस्तरीय समितीची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच नवीन नऊ प्रादेशिक परिवहन कार्यालयांची भर राज्यांत पडणार आहे. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची प्रादेशिक परिवहन अधिकारीपदावरील पदोन्नती रखडली आहे. या पदोन्नतीसाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी ज्येष्ठता सूचीत कोण कितव्या क्रमांकावर यावरून बरेच वाद उद्भवले आहे. त्यामुळे या नवीन कार्यालयाच्या माध्यमातूनच हा वाद निकाली निघणार काय? याकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे.

सह परिवहन आयुक्तांची ५ पदे वाढणार

राज्यात सह परिवहन आयुक्तांचे पूर्वी एकच पद मंजूर होते. परंतु आता राज्यातील परिवहन खात्यातील कामात सुसूत्रता आणण्यासाठी त्यात ५ नवीन पदांची भर घालण्यात येणार आहे. त्यामुळे आता राज्यात भविष्यात ६ सह परिवहन आयुक्त राहणार आहेत.

परिवहन खात्याच्या नवीन आकृतिबंधाला उच्चस्तरीय समितीची मंजुरी असून लवकरच अध्यादेश निघण्याची आशा आहे. या बदलांमुळे परिवहन खात्यातील काम आणखी गतिमान व पारदर्शी करण्याचा प्रयत्न आहे.

डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त, मुंबई.