देश स्वतंत्र झाला याचा आनंद आहे, पण आजच्या दिवशी देशाचे तुकडे झाले होते. देश खंडित झाला याचे दु:ख आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना गेल्या ७५ वर्षांच्या इतिहासाचे चिंतन करून भविष्यातील आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा संकल्प सर्वजण करूया, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
राष्ट्र निर्माण समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सक्करदरा चौक येथे आयोजित अखंड भारत संकल्प दिनाच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी सामूहिक वंदेमातरम् सादर करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मोहन मते, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, आ. नागो गाणार, संजय भेंडे, डॉ. उपेंद्र कोठेकर, गिरीश व्यास उपस्थित होते. १५ ऑगस्ट १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण ते सहज मिळाले नाही, असे सांगताना गडकरी म्हणाले, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशभक्तांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आपले सर्वस्व बलिदान केले. त्यांच्या त्यागातून आणि बलिदानातून हे स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याचा इतिहास हा परिश्रमाने रक्ताच्या, घामाच्या थेंबांनी लिहिला जातो. या देशाला देशभक्त, क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांना अभिवादन केले पाहिजे. तसेच, स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता देशाच्या सीमेचे रक्षण केले, ते सैन्यातील सर्व अधिकारी आज येथे उपस्थित आहेत अशा शूरवीरांचेही या कार्यक्रमात स्वागत असल्याचे गडकरी म्हणाले.
नागरिक म्हणून आपण सर्व नियमांचे पालन करू, आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, प्लास्टिक वापर बंद करू व स्वच्छ भारत निर्माण करण्याचा संकल्पही करू, असे आवाहनही गडकरी यांनी केले. यावेळी बावनकुळे, संजय भेंडे आणि आमदार मोहन मते यांची भाषणे झाली. प्रास्ताविक श्रीरंग वऱ्हाडपांडे यांनी तर संचालन राजेश समर्थ यांनी केले.