गोंदिया : वरथेंबी पाण्यावर अवलंबून असलेल्या धान पिकाच्या गोंदिया जिल्ह्यात रोहिणी व मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दोन-तीन वेळा तुरळक पाऊस पडला. या शिवाय या वर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, आता जून महिनाही अगदी शेवटच्या टप्प्यात असूनही पाहिजे तसा पाऊस जिल्ह्यात पडलेला नाही. त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरलेले महागमोलाचे बियाणे वाळू लागले आहे. परिणामी, शेतकरी चिंतातुर झाला आहे.
हवामान खात्याने यंदा लवकर व चांगला पाऊस राहणार, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, परिस्थिती काही वेगळीच आहे. जून महिना आता शेवटच्या टप्प्यात आला असूनही पाहिजे तसा पाऊस बरसलेलाच नाही. परिणामी, ज्या काही शेतकऱ्यांनी हिंमत करून नर्सरी लावली आहे, त्यांचे आता टेन्शन वाढले आहे. मृग नक्षत्रा ने शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्या आहेत. मृग नक्षत्र कोरडे गेले.
आतापर्यंतचे पावसाचे अंदाज चुकीचेच ठरले
हवामान खात्या कडून गोंदिया जिल्ह्याला सातत्याने यलो अलर्ट दिला जात आहे. परंतु तो अगदी फोल ठरला आहे. याशिवाय यंदाचे हवामान विभागाचे सर्व अंदाज ही पूर्णपणे खोटे ठरले आहेत. आकाशात ढगांची गर्दी व्हायला लागली की, शेतकऱ्यांच्या नजरा आपोआपच आकाशाकडे जातात. मात्र, काही वेळातच निराशा पदरी पडते.
८ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली ; पण परिसरात मृग नक्षत्राने शेतकऱ्यांचा हिरमोड केला आहे. अख्खे मृग नक्षत्र कोरडेच गेले. आता २२ जून रोजी आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली. शेतकऱ्यांची मदार ‘आर्द्रा’ नक्षत्राच्या ‘उंदरा’वर अवलंबून आहे. उंदराने अपेक्षेच्या अनुरूप आनंदसरी बरसवाव्यात व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलवावे, असे साकडे वरुणराजा कडे शेतकरी घालत आहेत.
ढगांची गर्दी जमते, पण पाऊसच नाही…
बुधवार २५ जून रोजी अकोला आणि नागपूर जिल्ह्यात धो धो बसल्यानंतर गोंदियात पण बरसणार असे वाटत होते. पण दाटून आलेले ढग मात्र बरसले नाही. गोंदिया जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी हिंमत करून नर्सरी टाकली आहे. मात्र पाऊस बरसत नसल्याने आता त्यांचे टेन्शन वाढले आहे. आकाशात काळ्याकुट्ट ढगांची रोजच गर्दी होते. पण काही भागांत अंगणातील सडा टाकण्या सारखा पाऊस पडतो आहे. त्या पेक्षा अधिक पाऊस अद्याप पर्यंत तरी बसलेला नाहीच.