अकोला : वीज वितरणातील वाढती हानी महावितरणसाठी डोकेदुखीची ठरत आहे. ती रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, अपेक्षित यश अद्याप आलेले नाही. त्यासाठी आता फिडर विलगीकरण केले जात आहे. अकोला परिमंडळात ‘आरडीएसएस’ योजनेंतर्गत प्रस्तावित १७८ पैकी ६२ फिडर विलगीकरण कार्यान्वित झाले.

११ फिडरचे काम पूर्ण झाले, तर १०५ फिडरचे काम सुरू आहे. फिडर विलगीकरणामुळे वितरण हानी कमी होऊन वीज पुरवठ्यात सुधारणा होणार असल्याचा दावा मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केला. अपूर्ण कामामुळे कंत्राटदारांवर नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली.

‘आरडीएसएस’ योजनेंतर्गत फिडर विलगीकरणाच्या कामाचा मुख्य अभियंत्यांनी आढावा घेतला. यावेळी अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा दीपक सोनोने,अतिरिक्त कार्यकारी अभियंता यामिनी पिंपळे, महावितरणचे सहाय्यक अभियंते (इन्फ्रा) अकोला ग्रामीण, अकोट, खामगाव, बुलढाणा, मलकापूर व वाशीम विभाग, तसेच ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

फिडर विलगीकरणामुळे वितरण हानी कमी होऊन वीज सेवेत सुधारणा होणार असल्याने काम पूर्ण करण्यासाठी ठरवलेल्या नियोजनानुसार ते होणे अपेक्षित आहे. विभागनिहाय आढावा घेतल्यानंतर अद्याप १०५ फिडरचे काम अपूर्ण असल्याने कंत्राटदार संस्थांच्या कामावर नाराजी व्यक्त करत त्वरित मनुष्यबळात वाढ करून कामाची गुणवत्ता राखून वेळेत ते काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्य अभियंत्यांनी दिले.

८० टक्केपर्यंत काम पूर्ण झालेल्या सर्व फिडरची तपासणी करून त्याचे उर्वरित काम त्वरित पूर्ण होण्यासाठी वेळापत्रक ठरवण्यात आले. त्याचबरोबर ‘आर.वो.डब्लू.’च्या कामाच्या अडचणीवर तातडीने उपाययोजना करण्याचे तसेच केंद्र शासनाच्या ग्रामीण विद्युतीकरण महामंडळामार्फत कामाच्या निरीक्षणासाठी नेमलेल्या त्रयस्त यंत्रणेमार्फत निदर्शनास आणून देण्यात आलेल्या दोषांवर दुरूस्ती करण्याच्या सूचना मुख्य अभियंत्यांनी दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृषी आणि गावठाण फिडरची विभागणी

‘आरडीएसएस’ योजनेत करण्यात येत असलेली फिडर विभागणीच्या कामामुळे कृषी आणि गावठाण फिडर वेगळे करण्यात येत आहे. अकोला परिमंडळांतर्गत १७८ फिडर वेगळे करण्याचे काम प्रस्तावित असून यामध्ये अकोला जिल्ह्यातील ९६ फिडरचा समावेश आहे. त्यापैकी ३४ चे काम पूर्ण झाले असून ६१ ची कामे सुरू आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील ६३ पैकी ३३ चे काम पूर्ण झाले असून ३० ची कामे सुरू आहेत. वाशीम जिल्ह्यात १९ पैकी ५ फिडरचे काम पूर्ण झाले असून १४ फिडरची कामे केली जात आहेत.