नागपूर : रोबोटिक मूत्रपिंड प्रत्यारोपण लवकरच नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील तज्ज्ञांच्या मदतीने करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी येथील तज्ज्ञ डॉक्टरांना प्रशिक्षणासाठी इतरत्र पाठवले जाणार आहे. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील राज्यातील पहिले रोबोटिक प्रत्यारोपण असेल. हे शासकीय रुग्णालय असल्यांस गरिबांना महागड्या रोबोटीक मूत्रपिंड प्रत्यारोपण येथे मोफत करता येईल.

युरोपियन देशांत अवयवदानाचा दर १० लाखांत ४० असला तरी भारतात ०.०१ टक्केच आहे. त्यातही देशात अडीच लाख मूत्रपिंडाची गरज असताना केवळ ७ हजार मिळतात. ही वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न गरजेचे आहे. नागपुरातील सुपरस्पेशालिटी रुग्णालय हे मध्य भारतातील मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे पहिले शासकीय केंद्र आहे. येथे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून राज्यातील पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण झाल्याचीही नोंद आहे. येथे आजपर्यंत जवळपास ८७ मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी झाले आहे. त्यापैकी बहुतांश प्रत्यारोपण शासकीय योजनेतून झाले आहे. मेडिकलमधील रोबोटिक सर्जरी युनिटचा लाभ आता मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या रुग्णांनाही होणार आहे. त्यामुळे येथे यंत्रमानव ही शस्त्रक्रिया करेल. त्याला संगणकावर तज्ज्ञ डॉक्टरच कमांड देतो. त्यासाठी मेडिकल प्रशासन सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील मूत्रपिंड विभागातील तज्ज्ञांना रोबोटिक शस्त्रक्रियेच्या प्रशिक्षणासाठी पाठवणार आहे. त्यानंतर मेडिकलच्या रोबोटिक यंत्राच्या सहाय्याने गरजू रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण होणार आहे. त्यासाठी काही रुग्णांची चाचपणीही केली जात आहे.

प्रशिक्षणासाठी संबंधित कंपनीकडून मदत कशी मिळणार?

नागपुरातील सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांना प्रशिक्षणाला पाठवण्यासाठी मेडिकलमध्ये रोबोटिक यंत्र उपलब्ध करणारी ‘एसएसआय मंत्रा’ ही कंपनी मदत करणार आहे. या कंपनीसोबत झालेल्या करारातील तरतुदीनुसार हे प्रशिक्षण उपलब्ध केले जाणार आहे.

मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये काय म्हणतात?

मेडिकल हे रोबोटिक शस्त्रक्रिया करणारे देशातील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. येथे आजपर्यंत वर्षभरात २२५ शस्त्रक्रिया झाल्या असून हा एवढ्या कमी कालावधीत सर्वाधिक शस्त्रक्रियेचा विक्रम आहे. येथे लवकरच रोबोटिक मूत्रपिंड प्रत्यारोपण केले जाणार असून त्यासाठी येथील तज्ज्ञ डॉक्टरांना प्रशिक्षणासाठी बाहेर पाठवले जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), नागपूर.