गडचिरोली : आदिवासी समाजातील बेरोजगार युवकाला मालवाहू वाहन खरेदीसाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडून कर्ज हवे होते. हे कर्ज मंजूर करण्यासाठी शाखा व्यवस्थापकाच्या नावाने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ कार्यालयातील कंत्राटी कार्यकारी लेखापाल रुपेश वसंत बारापात्रे याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सोमवार, १७ मार्च रोजी रंगेहाथ पकडले. ही कारवाई चामोर्शी मार्गावरील
महामंडळाच्या कार्यालयात करण्यात आली.

तक्रारदार हे आदिवासी समाजातील बेरोजगार युवक आहेत. त्यांनी महामंडळाच्या ऑनलाइन पोर्टलवर व्यवसायासाठी मालवाहू वाहन खरेदी कर्ज मंजुरीकरिता अर्ज केला होता. या कर्ज मंजुरीसाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. त्यांनी याविरोधात लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाकडे तक्रार केली. पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. रुपेश बारापात्रे याने शाखा व्यवस्थापकाच्या नावे पंच- साक्षीदारासमक्ष ५० हजार रुपयांची लाच मागितली. पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात सापळा रचण्यात आला व ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रुपेश बारापात्रे याला रंगेहाथ पकडण्यात आले. कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात कलम ७ ७ (अ) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (संशोधन २०१८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष पाटील करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्यवसाय करावा तरी कसा?

शबरी विकास महामंडळाच्या कार्यालय पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, असा आरोप नागरिकांचा आहे. शबरी आवास मंजुरीसाठी लाभार्थ्यांकडून पाच हजार शबरी महामंडळांतर्गत घरकुल मंजुरीसाठी प्रत्येक लाभार्थ्यांकडून पाच हजार रुपयांची मागणी येथील कर्मचारी करतात. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन येथील कर्मचाऱ्यांनी आपले हात ओले केले आहेत. आता कर्ज घेण्यासाठी सुद्धा पैश्यांची मागणी होत आहे. एकीकडे राज्य शासन गडचिरोलीच्या विकासाच्या दृष्टीने मोठमोठ्या घोषणा करत आहे. तर दुसरीकडे काही अधिकाऱ्यांच्या लाचखोरीमुळे मागास समाजातील व्यवसायासाठी इच्छुक तरुण वंचित राहत आहे. यामुळे व्यवसाय करावा तरी कसा, असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.