अमरावती : ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध धडक कारवाई करत ओडिशातून अमरावती जिल्ह्यात गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वाहनात गुप्त कप्पे तयार करून गांजाची तस्करी केली जात होती. गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे निर्देशजिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने आपली गुप्त माहिती यंत्रणा सक्रिय केली होती.

पोलीस उपनिरीक्षक मुलचंद भांबुरकर हे त्यांच्या पथकासह तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, काही व्यक्ती चारचाकी वाहनाने नागपूरकडून अमरावतीकडे मोठ्या प्रमाणात अवैध गांजाची वाहतूक करणार आहेत.या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने तत्काळ नागपूर-अमरावती हायवेवरील मोझरी दासटेकडी डवरगांव उड्डाणपुलाखाली नाकाबंदी केली. वाहनांची तपासणी सुरू असताना, एका विनाक्रमांक असलेल्या सिल्व्हर रंगाच्या बोलेरो प्रवासी वाहनाला थांबवण्यात आले.

पोलिसांनी वाहनातील रवी रामराव राठोड (वय ३६, रा. भिवापूर (कुहा) ता. तिवसा) आणि आकाश गौतम भडके (वय ३२, रा. वाई बोथ ता. नांदगाव खंडेश्वर) यांची चौकशी सुरू केली असता, आरोपींनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. यामुळे संशय बळावल्याने त्यांच्या वाहनाची अधिक तपासणी करण्यात आली. वाहनात पायदानाखाली दोन नंबर प्लेट्स (एम.एच. १७ ए.जे. २२८३ व सि.जी. १० ए.बी. २८४९) आढळून आल्या.वाहनातील ‘गुप्त कप्पे’ उघडकीस पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर आरोपींनी धक्कादायक माहिती दिली. त्यांनी कबूल केले की, त्यांनी गांजा लपवण्यासाठी वाहनात खास कप्पे तयार केले होते. हे गांजाचे गुटखे वाहनाच्या मागील बाजूच्या दोन्ही टेललाईटच्या आत, तसेच चालक व कंडक्टर बाजूच्या दरवाजाच्या खाली, पायदानच्या आतील बाजूस असलेल्या चेंबरमध्ये आणि वाहनाच्या खालील बाजूमध्ये चेंबरच्या आत तयार केलेल्या गुप्त कप्प्यात ठेवण्यात आले होते.

पोलिसांनी बोलेरोची झडती घेतली. यावेळी वाहनात ५३ खाकी टेपपट्ट्यांमध्ये गुंडाळलेला एकूण १०४ किलो ८७९ ग्रॅम वजनाचा गांजा, ज्याची अंदाजित किंमत २० लाख ६६ हजार ९६० रुपये आहे, जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुद्देमाल आणि आरोपी तिवसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.