नागपूर: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या जलसंधारण अधिकारी/वैज्ञानिक (सिव्हिल इंजिनीअरिंग) गट ‘ब’ पदाच्या परीक्षेत सागर गजानन नाठे या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण(महाज्योती) संस्थेच्या प्रशिक्षणार्थीने देशात सहावा क्रमांक मिळवून संस्थेचा आणि राज्याचा गौरव वाढवला आहे. सागर नाठे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील जलसंपदा विभागात वैज्ञानिक (सिव्हिल इंजिनीअरिंग) गट ‘ब’ या अधिकाऱ्याच्या पदावर नुकतेच रुजू झाले आहे.
‘महाज्योती’ संस्था राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास (एसबीसी) प्रर्वगातील विद्यार्थ्यांसाठी पूर्व परीक्षा योजना, विद्यावेतन, निवासी प्रशिक्षण केंद्रे, विशेष अभ्यासिका आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या साहाय्याने दर्जेदार अभ्यासासाठी विविध योजना राबवते.
सागर नाठे याने २०२२ मध्ये ‘महाज्योती’च्या पूर्व परीक्षा योजनेत यश मिळवून या योजनांमध्ये सहभाग घेतला. संस्थेने त्याला ११ महिन्यांचे मोफत प्रशिक्षण व आर्थिक पाठबळ स्वरूपात विद्यावेतन दिले. या सर्व पाठबळाच्या जोरावर त्याने आपली वाटचाल युपीएससीपर्यंत केली आणि देशात सहावा क्रमांक मिळवून जलसंधारण अधिकारी होण्याचा मान पटकावला. ‘महाज्योती’चे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी सागर नाठेच्या यशाबद्दल समाधान केले.
आर्थिक अडचणीतही काढली यशाची वाट, मोफत प्रशिक्षणामुळे उजळले सागरचे नशीब
सागर नाठे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण उमरा येथे झाले. बालपणापासून अभ्यासात चमक दाखवणाऱ्या सागरसमोर उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडचणी होत्या. मात्र २०२२ मध्ये ‘महाज्योती’मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेत यश मिळवून त्याला संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्यानंतर सागरला ‘महाज्योती’तर्फे विद्यावेतन स्वरूपात आर्थिक सहाय्य मिळाले आणि ११ महिन्यांचे मोफत व दर्जेदार प्रशिक्षण लाभले. या पाठबळामुळेच त्याला नागपूरच्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपाययोजना संस्था, अकोला येथील भूमी अभिलेख विभाग आणि हिंगोली येथील जलसंपदा विभाग यांसारख्या शासकीय संस्थांमध्ये नोकऱ्या मिळाल्या. परंतु त्याचा ध्यास होता युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करायची होती. सतत अभ्यास, चिकाटी आणि ‘महाज्योती’च्या सहकार्याच्या बळावर सागरने अखेर युपीएससी परीक्षेत देशात सहावा क्रमांक मिळवून स्वतःला सिद्ध केले. यावेळी सागर नाठे यांनी प्रतिक्रीया देतांना सांगितले की, ‘महाज्योती’ ही केवळ एक संस्था नव्हे, ती माझ्या जीवनातील अडथळ्यांवर मात करण्याची प्रेरणा ठरली. त्यांच्या मोफत मार्गदर्शनामुळे मला योग्य दिशा मिळाली. आर्थिक अडचणी असताना विद्यावेतनाच्या माध्यमातून मिळालेल्या मदतीमुळे माझ्या अभ्यासाला बळ मिळाले.