भंडारा : वेतनाच्या लेखा शीर्षकात वेतन अधीक्षकांनी वाउचर नंबर न घातल्याने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन होण्यास विलंब होत आहे. असा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. दरम्यान याबाबत विचारणा करण्यासाठी शिक्षक, कर्मचारी भंडारा वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय (माध्यमिक) येथे सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याने शिक्षक कर्मचाऱ्यांना उत्तर देणे टाळण्यासाठी वेतन पथकाच्या अधिकाऱ्यांनी चक्क कार्यालयातील फोनचा रिसीव्हर बाजूला ठेवला आहे. शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेतन पथकाच्या कार्यालयात धडक दिली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

जून महिन्याचे दोन आठवडे होत आले आहे मात्र माध्यमिक वेतन पथकाच्या अधीक्षकांनी वेतनाच्या लेखा शीर्षकात व्हाउचर घातले नाही, याबाबत विचारणा करण्यास विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी २४ जूनला वेतन पथकाच्या कार्यालयात धडक दिली. त्यावेळी, त्यावेळी अधीक्षकांच्या कार्यालयातील टेलिफोन संच सुरू आहे का याची विचारणा तेथील कर्मचाऱ्यांना केली. वेतन पथक कार्यालयातील टेलिफोनचा संच अस्ताव्यस्त व बंद असल्याचे दिसून आले. तसेच टेलिफोन संचाचा रिसिव्हर बाजूला ठेवल्याचे आढळून आले.

विशेष म्हणजे टेलिफोन संच टिनाच्या कपाटावर पडून होते. तो संच व्यवस्थित करून वेतन पथक अधीक्षक यांच्या टेबलावर ठेवण्याच्या प्रयत्न एका कर्मचाऱ्यांनी केला. आधी आम्हाला छायाचित्र घेऊ द्या, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर, त्या टेलिफोन संचाचा खालच्या भागातील एक बटण बंद करून ठेवण्यात आल्याचा प्रकार दिसून आला. वेतन पथकाच्या एका कर्मचाऱ्यांनी टेलिफोनचे लागलेले कनेक्शन व बटन व्यवस्थित केले. त्यानंतर कुठे वेतन पथकाच्या कार्यालयातील टेलीफोन नंबरवर रिंग जाऊ लागली.

मागील चार महिन्यापासून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन उशिरा होत आहे. मे महिन्याचे वेतन १९ जूनला झाले. तसेच एप्रिल महिन्याचे वेतन सुद्धा उशिराने झाले होते. शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा लगतच्या दुसऱ्या दिवशी वेतनाच्या दहा लेखा शीर्षकाचे वाउचर नंबर घातले गेले पाहिजे होते. आठवडा होत असतानाही वेतनाच्या लेखाशीर्षकांमध्ये वाउचर नंबर न घातल्याने जून महिन्याचे वेतन विलंबाने होणार आहेत. वेतन पथकाच्या अधीक्षकांच्या मनमर्जीच्या कार्यशाळेमुळे वेतन विलंबाने होत आहेत असा आरोप करत शिक्षकांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या अधीक्षकावर कारवाई करण्याची मागणी मुख्याध्यापक संघाचे राजू बांते, प्रमोद धार्मिक, सुनील घोल्लर, राधेश्याम धोटे, शिक्षक परिषदेचे अंगेश बेहलपाडे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे गंगाधर भदाडे, संजय ब्राह्मणकर, शिक्षक भारतीचे दिनेश कांबळे आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेतन पथक अधीक्षक प्रभा दुपारे यांनी केली आहे.

हलचल रजिस्टर आहे पण..

प्रत्येक सरकारी कार्यालयात हलचल रजिस्टर असते. कार्यालयीन वेळेत अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना काही कामे आली तर त्यांना हलचल रजिस्टरवर नोंद करून घेणे अनिवार्य असते. वेतन पथकातही हलचल रजिस्टर आहे. त्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या नोंदी दिसून आल्या. परंतु, ६ जुलै २०२३ ला अधीक्षक म्हणून रुजू झालेल्या प्रभा दुपारे यांच्या हलचल रजिस्टर एकही नोंद नाही.

कार्यालयात संपर्क नंबरच नाही..

वेतन पथक ( माध्यमिक) कार्यालयात असणाऱ्या कोणत्याही फलकावर प्रमुख अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक लिहिलेले नाहीत. वेतन पथकानी व्हाट्सअप समूह तयार केला आहें. परंतु तो समूह ‘ओन्ली एडमिन ‘ साठी असल्याने मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्या समूहावर मेसेज घालू शकत नाही. तसेच बऱ्याच मुख्याध्यापकांजवळ अधीक्षकांचे व काही कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर असताना सुद्धा शिक्षकांचे फोन उचलले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पायपीट करत भंडारा वेतन पथकाला कर्मचाऱ्यांना यावे लागते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारणे दाखवा नोटीस बजावणार…

भविष्य निर्वाह निधी व वेतन पथकाच्या अधीक्षक प्रभा दुपारे यांच्या कारभाराच्या तक्रारी झालेल्या आहेत. याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिक मंगला गोतारणे यांनी शिक्षक संघटनांना सांगितले.