वाशीम : समृध्दी महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील वारंगी टोल नाका येथे वीर जवान आकाश अढागळे यांचे पार्थिव आज दुपारी १२ वाजे दरम्यान दाखल झाले. मात्र, यावेळी प्रशासनाचे कुठलेच अधिकारी, लष्करी अधिकारी उपस्थित नव्हते. तसेच जी रुग्णवाहिका होती तीही लहान असल्याने नागरिकांची प्रचंड रोष व्यक्त केला. प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप करीत नागरिकांनी दोन ते तीन दिवसापासून समृध्दी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करून नाराजी व्यक्त केली.
शिरपूर येथील जवान आकाश अढागळे भारतीय सैन्यात पाच वर्षापूर्वी दाखल झाला होता. लेह येथे सेवा बजावत असताना उंच पहाडीवरून पडल्याने गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना १० सप्टेंबर रोजी त्यास विर मरण प्राप्त झाले. आज त्यांच्यावर शिरपूर येथे शासकीय इतमामात अंतीम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी त्याचे पार्थिव नागपूर येथून मालेगाव तालुक्यातील समृध्दी महामार्गा जवळील वारंगी टोल नाका येथे दाखल होताच तिथे प्रशासनाचे कुणीही अधिकारी उपस्थित नव्हते. तसेच लष्करी अधिकारी देखील नव्हते.
हेही वाचा >>>विला ५५ कॅफेत हुक्क्याचा धूर, नागपूरच्या गोकुळपेठेतील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा
यासह अगदी लहान वाहनातून त्यांचे पार्थिव आणल्याने नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. नागरिकांनी तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. शहीद जवान यांचे पार्थिव लष्करी वाहनातून शासकीय रीतिरिवाजा नुसार आणले जावे, अशी मागणी नागरिकांनी केली. यामुळे समृध्दी महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. याबाबत जिल्हाधिकारी बुवनेश्र्वरी एस यांना संपर्क साधला असता याबाबत मार्ग काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.