बुलढाणा : मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांचे आम्ही आभारी आहोत. त्याच्या दीर्घ, आक्रमक आरक्षण विषयक आंदोलनामुळे आम्हाला अनुसूचित जाती च्या आरक्षणासाठी लढा उभारण्याची प्रेरणा मिळाल्याचे प्रतिपादन बंजारा आरक्षण कृती समितीचे नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष अडव्होकेट संजय राठोड यांनी येथे केले. येत्या २५ सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल बंजारा समाजाचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणावजा माहिती देखील ऍड राठोड यांनी दिली आहे.

काल संध्याकाळी उशिरा बुलढाणा येथील जिल्हा पत्रकार भवनात बंजारा आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी समवेत संवाद साधला. यावेळी कृती समितीची भूमिका मांडताना संजय राठोड यांनी प्रारंभीच मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले. यानंतर त्यांनी त्यांची कारण मिमांसा सुद्धा केली.

यावेळी संजय राठोड म्हणाले की, बंजारा समाज हा अजूनही इतर समाजापासून दूर आणि तांड्या वस्तीत राहणारा समाज आहे. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती मधून आरक्षण मिळावे ही मागणी नवीन नसल्याचे सांगून आमच्या समाजाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्यांच्या कारकिर्दीत यासाठी भरपूर प्रयत्न केले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेऊन बंजारा समाज हा आदिवासी आहे हे पटवून दिले. मात्र अंतर्गत विरोधमुळे तेंव्हा ही मागणी बारगळली. मात्र आता समाज नव्याने जागृत झाला आहे.

विनायक राठोड यांनी सांगितले की आजही तेलंगणा या राज्यामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे तर कर्नाटक मध्ये अनुसूचित जातींचे आरक्षण लागू आहे. तसेच सी.पी. अ‍ॅण्ड बेरार प्रोव्हिंन्समध्ये येत असलेल्या जिल्ह्यातील बंजारा जमातीला आदिवासीचे आरक्षण मिळत होते. आजपर्यंत नेमण्यात आलेल्या विविध आयोगांनी बंजारा समाज हा संवैधानिक आरक्षणास पात्र आहे, अशी शिफारस केली आहे. त्यामुळे बंजारा समाज अनुसूचित जमातीचे आरक्षणाकरीता पात्र ठरतो. परंतु बंजारा समाज आजही अनुसूचित जमातीचे आरक्षणापासून वंचित असल्याने या समाजावर अन्याय झालेला आहे.

यावेळी समाजाच्या वतीने माजी जिप सभापती अभय चव्हाण यांनी सांगितले की, हैदाराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार बंजारा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. आदिवासी समाजाचा आरक्षणाचा हिस्सा हिरावून न घेता बंजारा समाजाला आरक्षण द्यावी अशी आमची आहे. बंजारा व वंजारी हे एकत्र नाहीत असे स्पष्ट शब्दात सांगितले.

मोर्चात महिला अग्रस्थानी

येत्या २५ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्याल्यावर सकल बंजारा समाजाचा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात अग्रभागी महिला, युवक सर्वात शेवटी सर्व पक्षीय नेते असतील. महिला समाजाच्यावतीने जिल्हाधिकारीयांना निवेदन सादर करतील. यावेळी समितीचे भरत राठोड, विठ्ठल चव्हाण, राजेश राठोड, साहेबराव चव्हाण, सोनू चव्हाण, गुलाब राठोड, प्रेम राठोड हजर होते.