वर्धा : सलग तीन दिवसापासून जिल्ह्यात ठाण मांडणाऱ्या पावसाने शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे. जून कोरडा गेल्याने चिंतेत पडलेला शेतकरी वर्ग आता झड सूरू झाल्याने सुखावला. असा पाऊस शेतीसाठी पूरक ठरत असल्याचे म्हटल्या जाते. शेती कामे जोमात असतांनाच काही भाग मात्र पावसाने क्षतीग्रस्त होत आहे. नाल्यांचे पूर, नदी पात्र भरल्याने गावात पाणी, रस्ते उखडणे असे प्रकार सूरू झाले आहे.
हिंगणघाट तालुका हा पाण्याचा सर्वाधिक फटका बसलेला तालुका ठरला आहे. येथील राष्ट्रीय महामार्गास पाण्याचा तडाखा बसून खड्डे पडले. ही नेहमीचीच बाब म्हणून यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अतुल वांदिले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत तक्रार केली. अनेक मार्ग क्षतीग्रस्त झाल्याने वाहतुकीचा खोलंबा झाला. अपघात होत आहेत.
रस्ते उखडल्याने पाणी साचत असून रस्त्यावर पूर येत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. त्यावर गडकरी यांनी अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश देत कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याचे फर्मान सोडले. जागोजागी भ्रष्ट कामे झाल्याने नागरिक त्रस्त असल्याचे वांदिले म्हणतात. हिंगणघाट तालुक्यात यशोदा नदीस पूर आल्याने आलमडोह मार्ग बंद पडला आहे. आज सकाळपासून वणा नदी पण तुडुंब वाहू लागली आहे. या भागात कामेच झाली नसल्याचे गाऱ्हाने आहे.
लाल नाला प्रकल्पच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जलाशयात वाढ झाली म्हणून पाणी पातळी नियंत्रणात आणण्यासाठी आज सकाळपासून या धरणाचे दोन दारे उघडण्यात आली. परिणामी लाल नाला, पोथरा, वर्धा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. निम्न वर्धा धरणाची सर्व २१ दारे उघडून पाणी सोडणे सूरू झाले आहे. हा विसर्ग वाढू शकतो म्हणून नदी पात्रजवळ जाण्याचे टाळण्याचा ईशारा आहे. लोणसावली डोरली तसेच लोणसावली ते शेकापूर रस्ता ठप्प पडला आहे. तसेच जूना बोरगाव ते नवीन बोरगाव, शिरपूर नाला, अल्लीपूर कानगाव हे मार्ग आज वाहतुकीस बंद करण्यात आले आहे.
वर्धा : सरुळ येथील यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वर्धा ते राळेगाव मार्ग बंद झाला आहे. सलग तीन दिवसापासून जिल्ह्यात ठाण मांडणाऱ्या पावसाने शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे. नाल्यांना पूर तसेच नदी पात्र भरल्याने गावात पाणी शिरणे, रस्ते उखडणे असे प्रकार सुरू झाले आहेत.… pic.twitter.com/QDQVXP91o2
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) July 9, 2025
अनेक वस्त्यात पाणी शिरल्याने नागरिक रस्त्यावर आले आहे. हिंगणघाटचे तहसीलदार शिंदे म्हणतात की अनेक रस्ते बंद पडले आहे. आज सकाळी वणा नदी परिसर तसेच अन्य भागात सतर्क राहण्याचा ईशारा दिला. काही गावावर लक्ष ठेवून आहे. सध्या शिफ्टिंग करण्याची स्थिती नाही. ताज्या माहितीनुसार रेड अलर्टचा ईशारा देण्यात आल्याने आज बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये, कोचिंग सेंटर्स बंद राहतील. पुढील काळात अती मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हिंगणघाट शहरात कुणावार पेट्रोल पंप परिसर जलमय, स्वप्न नगरी, पद्मावती नगर पाण्यात गेले आहे.