नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये पुन्हा काही शिक्षणाधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे अटकेच्या भीतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी दोघे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आठ दिवसांपासून त्यांचा संपर्क होत नसून भ्रमणध्वनीही बंद असल्याची माहिती आहे. या प्रकरणात यापूर्वी एसआयटीने शिक्षण संस्थाचालक दिलीप धोटे, चेटुले यांना अटक केली होती.
त्यानंतर बनावट शालार्थ आयडी तयार करून शिक्षकपदी नियुक्ती केल्याप्रकरणी सदर पोलिसांनी नुकतीच चेतक राजेश डोंगरे (४४), सदानंद कोठीराम जांगडे (४५) आणि गंगाधर नत्थू डोंगरे सर्व रा. गोसे बु. (पवनी), भंडारा यांना अटक केली. या आरोपींनी महेंद्र म्हैसकर याच्यासोबत कट रचून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. गोसे बु. (ता. पवनी) येथील विनोद शिक्षण संस्था, विनोद हायस्कूल येथे गैरमार्गाने पदभरती केल्याचा आरोप आहे.
या संस्थाचालकांच्या अटकेनंतर पोलिसांच्या हाती नवीन माहिती लागली आहे. त्यामुळे यापूर्वी प्राथमिक शिक्षण विभागात अधिकारी राहिलेल्यांची चौकशी केली जाणार असल्याचे कळते. या पार्श्वभूमीवर नागपुरातील प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी आठ दिवसांपासून फरार आहेत.
नीलेश वाघमारेला कुणाचे बळ?
या घोटाळ्याचा सूत्रधार आणि वेतन विभागाचा अधीक्षक नीलेश वाघमारे याचा अटक वॉरंट निघाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक गोवा, मुंबईला गेले होते. मात्र, त्यांना अपयश आले. त्यानंतर वाघमारे हैद्राबादमध्ये असल्याची माहिती मिळाली. मात्र, तेथेही पोलीस त्याला अटक करू शकले नाहीत. तीन महिन्यांपासून वाघमारे फरार आहे. या संपूर्ण घोटाळ्याची मोठी माहिती वाघमारेकडे आहे. मात्र, वाघमारेचा शोध लागत नसल्याने त्याला कुणाचे बळ मिळत आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.