scorecardresearch

देशासाठी धावण्याचा ध्यास : ‘देव’ धावतो दररोज २५ किमी; ‘अल्ट्रा ट्रेल रेस’मध्ये विक्रम करण्याचे ध्येय

’अल्ट्रा ट्रेल रेस’मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करायचे उद्दिष्ट पायांमध्ये साठवून ‘देव’ दररोज २५ किमी धावतो. त्याचे परिश्रम फळास आले असून भारताकडून ’अल्ट्रा ट्रेल रेस’साठी त्याची निवड झाली आहे.

Dev Chaudhary Yavatmal District
देशासाठी धावण्याचा ध्यास : ‘देव’ धावतो दररोज २५ किमी; 'अल्ट्रा ट्रेल रेस’मध्ये विक्रम करण्याचे ध्येय (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

यवतमाळ : देशासाठी आपणही काही योगदान द्यावे, या ध्यासातून त्याला धावण्याचा छंद जडला. डोंगर, शिखर, किल्ले अशा खडतर धावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ’अल्ट्रा ट्रेल रेस’मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करायचे उद्दिष्ट पायांमध्ये साठवून ‘देव’ दररोज २५ किमी धावतो. त्याचे परिश्रम फळास आले असून भारताकडून ’अल्ट्रा ट्रेल रेस’साठी त्याची निवड झाली आहे.

पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथील देव श्रीरंग चौधरी याचा धावण्याचा सराव अचंबित करणारा आहे. बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतलेला देव धावण्याच्या सरावासोबतच चरितार्थासाठी शेती करतो. धनोडा (ता. महागाव) येथे त्याची शेती आहे. ‘अल्ट्रा रन रेस’ धावणारा तो विदर्भातील एकमेव तरुण आहे. महाराष्ट्रातील बहुतांश सर्व डोंगर, किल्ले, शिखर त्याने धावून अत्यंत कमी वेळेत सर केले आहेत. रस्त्यांवरील धाव स्पर्धा, क्रीडा मैदानावरील स्पर्धा व टेकडीवरील स्पर्धांमध्येही सातत्याने धावत आहे. आतापर्यंत त्याने ७० पेक्षा जास्त स्पर्धांमध्ये सहभाग घेवून बक्षिसे मिळविली आहेत. दिल्ली येथील इंडियन बॅकयार्ड अल्ट्रा रेसचे संचालक गगनदीप यांनी त्याला ‘धावणारा मराठी माणूस’ ही उपाधीच दिली आहे. देशासाठी ’अल्ट्रा रन रेस’मध्ये जिंकायचे या ध्यासाने देवला पछाडले आहे. या स्पर्धेत ४२ किलोमीटरपेक्षा अधिक अंतर धावावे लागते. त्यामुळे त्याने अत्यंत कमी वेळात हे उद्दिष्टही गाठले आहे.

हेही वाचा – पोटनिवडणुकीबाबत अद्याप पक्षामध्ये चर्चा नाही; जयंत पाटील यांची भूमिका

शाळेत असताना पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांना बघून देवला धावण्याची आवड निर्माण झाली. ‘पहिल्या दिवशी १०० मीटर धावलो. धावताना पडल्याने ओठ फाटले व टाके पडलेत. दुसऱ्या दिवशी पुन्हा मैदानावर गेलो. तेथील मुलांनी चिडवले. त्यावेळी खूप धावायचे ठरविले. सकाळ, दुपार, संध्याकाळ सराव करू लागलो. दोन महिन्यानंतर त्या मुलांशीच शर्यत लावली. एक हजार ६०० मीटर अंतर पाच मिनिटे नऊ सेकंदात धावलो. त्यानंतर नियमित सराव केला. सुरुवातीला टायमर लावून पाच किमी, नंतर १०, २१ व त्यानंतर ४२ किलोमीटर धावायला सुरुवात केली. या सरावानंतर ’अल्ट्रा रन रेस’मध्ये सहभागी झालो’, असे देव चौधरी याने सांगितले.

देव सरावासाठी सकाळी चार वाजता उठतो. स्ट्रेचिंग, वार्मअप, व्यायाम करतो. दररोज २० ते २५ किमी धावतो. गावाशेजारचा डोंगर धावतच चढतो. हा सराव शेतात काम करून करीत असल्याचे देवने सांगितले. स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या प्रेरणेतून धावण्याची तयारी सुरू असल्याचे देव म्हणाला. सराव करताना पायांच्या नखांमधून रक्तस्राव होतो, पायांमध्ये अक्षरश: गोळे येतात तेव्हा आई धावू नकोस असे सांगते. परंतु, देशासाठी काहीतरी करायचे आहे आणि जग जिंकायचे आहे, या भावनेतून रोज धावण्याचा सराव करतो, असे देव याने सांगितले.

हेही वाचा – पुणे: राष्ट्रवादी सरपंचाच्या हत्येप्रकरणी चार संशयित ताब्यात

अनेक स्पर्धांमध्ये अव्वल

देवने आतापर्यंत विविध स्पर्धांत धावून त्या जिंकल्या आहेत. बेंगळुरू येथील हेनूर बॉम्बू रनर स्पर्धेत १६१ किमीमध्ये तो प्रथम आला. जंपिंग गोरिला माउंटेन ट्रेल रन स्पर्धेत १२० किमीमध्ये भारतातून प्रथम आला. महाबळेश्वर इंण्डो मॅरेथॉन स्पर्धेतही भारतातून प्रथम आला. इंडियन बॅकयार्ड अल्ट्रा लास्ट मॅन स्टँडिंग ऑफ इंडिया स्पर्धेत सहावा क्रमांक पटकावला. द मावळा घाटी अल्ट्रा ट्रेल ७५ किलोमीटर स्पर्धेत आठव्यास्थानी होता. दिल्लीत झालेल्या बीग डॉग बॅकयार्ड अल्ट्रा वर्ल्ड चॅम्पिएनशिपमध्येही त्याने प्रतिनिधित्व केले आहे. सिंहगड, रायगड आणि तोरणा किल्ल्यांवर अल्ट्रा ट्रेल रनमध्ये कास्यपदक मिळविले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 14:50 IST

संबंधित बातम्या