नागपूर: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाची हृदयद्रावक बातमी रिक्षावर शहरभर फिरून रडत रडत सांगणारे ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते दामू मोरे यांचे सोमवारी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांनी मृत्यूपूर्वी केलेल्या संकल्पानुसार त्यांचे मेडिकलला देहदान करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक, मुलगा व मोठा आप्त परिवार आहे.
दामू मोरे यांचा जन्म एका आंबेडकरी कुटुंबात झाला. साउंड सर्व्हिसचा त्यांच्या घरगुती व्यवसाय होता. मोरे साऊंड सर्व्हिस तेव्हा चांगलेच प्रसिद्ध होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा दामू हे १२ वर्षाचे होते. त्या दिवशी दुकानात असताना बातमी मिळाली ‘बाबासाहेब गेले’. घरातील मोठ्यांनी स्वतःचा शोक बाजूला ठेवून, ही बातमी जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी लहानग्या दामूवर सोपवली. त्या दिवशी नागपूरच्या गल्लीबोळांमध्ये एका रिक्षातून फिरणारा हा छोटा मुलगा, हातात माईक घेऊन, संपूर्ण देशाच्या भावनांवर घाला घालणारी बातमी सांगत होता.
लोकांच्या डोळ्यांत पाणी आलं, काहींनी विश्वास न बसून त्याच्यावर ओरड केली, काहींनी रागाने धाव घेतली; पण त्या आवाजामागे फक्त एक पोरगं नव्हतं, तर एक जबाबदारी होती, एक सत्य होतं आणि एक असीम वेदना होती. दामू मोरे ही आठवण नेहमी सांगायचे. त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी मेडिकलमध्ये त्यांचे देहदान केले.
इंदिरा गांधींनी केले होते कौतुक
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथून निवडणूक लढवीत होते. त्यांच्या प्रचारासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची सभा पुसदला होणार होती. या सभेच्या ध्वनिक्षेपणाची व्यवस्था नागपूरच्या मोरे साउंड सर्व्हिसेसकडे होती. नाईक यांनी दामोदर मोरे यांना सभेच्या दिवशी सकाळी बंगल्यावर बोलवले. इंदिरा गांधी यांनी सभेसाठी ध्वनिव्यवस्था कुणाची आहे, अशी विचारणा केली. नाईक यांनी सागितले की, नागपूरच्या मोरे यांची. इंदिरा गांधी उद्गारल्या, मग काही टेन्शन नाही.
दामोदर मोरे हे नाट्य आणि ध्वनिक्षेत्रात दामू मोरे म्हणून ओळखले जात. नागपुरातील प्रसिद्ध अशा पोद्दारेश्वर मंदिर रामनवमी यात्रा, दीक्षाभूमी येथील धम्मचक्र परिवर्तन दिनासाठीही त्यांची साऊंड सर्व्हिस राहत असे.
लतादीदींचा होता विश्वास
नागपुरात एका कार्यक्रमात झालेल्या गोंधळानंतर गानकोकीळा लता मंगेशकर यांनी नागपुरात कार्यक्रम करणे थांबविले होते. पुढे अनेक वर्षांनी त्यांचा आणि मंगेशकर भावंडांचा सत्कार नागपुरात ठरला. त्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत लतादीदी सगळी माहिती देत होत्या. ध्वनिव्यवस्था कुणाची राहील, या त्यांच्या प्रश्नाला कुणीतरी ‘मोरे अँड कंपनी’ची असे उत्तर दिले. लतादीदी लगोलग उत्तरल्या, ‘अच्छा, दामू आहे, मग काही हरकत नाही’, अशी आठवण नागपुरातील रंगकर्मी भागवत तिवारी यांनी लिहून ठेवली आहे.