गडचिरोली: चंद्रपूर मार्गावरील जिल्हा व सत्र न्यायालय चौकात २९ एप्रिल रोजी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विलास शंकर वासनिक (वय ५७) रा. मुरखळा यांच्या दुचाकीला हायवा ट्रकने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. ही बाब समजताच प्रभारी पोलीस अधीक्षक यतिश देखमुख यांनी तत्काळ वासनिक यांना हेलिकॉप्टरने नागपूरला पाठविले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
२९ एप्रिल रोजी सकाळी विलास वासनिक हे कार्यालयाकडे जात असताना त्यांची मोटारसायकल एमएच-३४ एम-८९७० क्रमांकाच्या हायवा ट्रकच्या चाकाखाली सापडली. यात त्यांचा डावा पाय पूर्णतः चेंदामेंदा झाला. अपघातानंतर विलास वासनिक यांना शहर पोलिसांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तातडीने उपचारानंतर त्यांना नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात हेलिकॉप्टरने हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वासनिक यांची प्राणज्योत मालावली.
जखमी वासनिक यांचा मुलगा बाबासाहेब वासनिक हा देखील पोलीस दलात कार्यरत असून, सध्या कोठी पोलीस मदत केंद्रात कर्तव्यावर आहे. पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे घटनेचा तपास करीत आहेत.
पोलीस अधीक्षकांची संवेदनशिलता
अपघाताची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेत वासनिक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. प्रकृती चिंताजनक असल्याने देशमुख यांनी वासनिक यांना तात्काळ हेलिकॉप्टरने नागपूरला नेण्याची व्यवस्था केली. परंतु त्यांचे प्राण वाचू शकले नाही.
अपघाताच्या संख्येत वाढ
शहरातून जाणाऱ्या गडचिरोली-चंद्रपूर महामार्गावर मागील काही काळापासून अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. लोहखनिज आणि वाळू वाहतूक करणारे अवजड ट्रक या मार्गावरून भरधाव जात असल्याने पादचारी आणि दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊ जावे लागत आहे. काही ठिकाणी सूचनाफलक लावण्यात आले असले तरी अपघाताची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे गतिरोधक बसाविण्याची मागणी करण्यात येत आहे.