गडचिरोली : छत्तीसगडच्या नारायणपूर व बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर झालेल्या चकमकीत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त जप्त करण्यात आले. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत दंडकारण्यातील अबुझमाडमध्ये गेल्या पाच महिन्यांत छत्तीसगड पोलिसांनी चकमकीत १०७ नक्षलवाद्यांना ठार केले आहे.

हेही वाचा >>> उष्णतेची लाट लावतेय वैदर्भीयांची वाट, सूर्य ओकू लागलाय आग!

यावरून माओवाद्यांनी पत्रक काढून छत्तीसगड पोलीस निरपराध नागरिकांनाही लक्ष्य करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. दरम्यान, छत्तीसगडच्या नारायणपूर-बिजापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात प्लाटून क्र. १६ आणि एरिया कमिटीचे नक्षली दबा धरून बसल्याची माहिती यंत्रणेला मिळाली होती. यावरून नारायणपूर, दंतेवाडा आणि बस्तर जिल्ह्यातील विशेष सुरक्षा बलाच्यावतीने २३ मे रोजी सकाळी ११ वाजता संयुक्त नक्षलवादविरोधी मोहीम राबविली जात होती.

हेही वाचा >>> बुलढाणा : तब्बल पाचशे ब्रास अवैध वाळूसाठा जप्त, जागेवरच लिलाव; वाळूतस्करांच्या तीन बोटी…

यावेळी नक्षलवाद्यांनी जवानांवर जोरदार गोळीबार सुरू केला. यास प्रत्युत्तर देण्यासाठी जवानांनीही आक्रमक पवित्रा घेतला. यात सात नक्षलवादी ठार झाले. मृत नक्षली गणवेशात होते. चार ते पाच तास चकमक चालली. यावेळी परिसरात सात शस्त्रेदेखील आढळून आली. आणखी काही नक्षलवादी जखमी या चकमकीत पोलीस जवान आक्रमक झाल्यावर नक्षलवाद्यांनी पळ काढला. घटनेत आणखी काही नक्षलवादी जखमी झाले असल्याचा अंदाज दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी व्यक्त केला आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.