नागपूर : नवतपा सुरू होण्यास आणखी काही दिवस बाकी असताना विदर्भात मात्र आताच उष्णतेची लाट आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे. अकोला शहरात गुरुवारी सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान देखील ३०.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

हेही वाचा >>> बुलढाणा : तब्बल पाचशे ब्रास अवैध वाळूसाठा जप्त, जागेवरच लिलाव; वाळूतस्करांच्या तीन बोटी…

मोसमी पावसाच्या प्रगतीकडे सर्वांचे डोळे लागले असताना आणि उन्हाळा अखेरच्या टप्प्यात आला असताना कमाल तापमानाचा पारा वाढतच आहे. भारतीय हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी राज्यात उष्णतेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला. खात्याच्या अंदाजानुसार विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात २६ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम असणार आहे. पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट तर पूर्व विदर्भातदेखील सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमान नोंदवल्या जात आहे. बुधवारी अकोल्यात ४४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले, तर अवघ्या २४ तासात ते ४५.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले. दरम्यान, २२ ते २६ मे दरम्यान राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घसरण झाली होती. आता पावसाने पाठ फिरवताच पुन्हा एकदा तापमान वाढू लागले आहे. गेल्या तीन दिवसात तर त्यात झपाट्याने वाढ झालेली दिसून आली. या मोसमातील तापमानाचा हा उच्चांक असण्याचीही शक्यता आहे. विदर्भात काही भागात उन्ह तर काही भागात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे. दिवसा अंगाची लाहीलाही करणारी उष्णता आणि सायंकाळी वादळीवारा व पावसाच्या हलक्या सरी असे वातावरण काही दिवसांपासून आहे. मात्र, यामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. वादळी पावसाने हा उकाडा कमी होणार नसून त्यासाठी मोसमी पावसाचीच प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

हेही वाचा >>> अकोला : अवैध सावकारीविरोधात छापेमारी, आणखी तीन ठिकाणी…

पाच शहरांचे तापमान ४३ अंशांपेक्षा अधिक विदर्भात कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ होत आहे. अकोल्यात सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले असले तरी इतर शहरात देखील तापमानवाढीचा वेग कायम आहे. विदर्भातील पाच शहरांनी ४३ अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक तापमान गाठले आहे. यात यवतमाळ ४३.५ तर अमरावती, ब्रम्हपूरी, चंद्रपूर आणि वर्धा येथे ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ गडचिरोली ४२.६ तर बुलढाणा, वाशीम येथे ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. नागपूर येथे ४१.९, गोंदिया ४०.४, भंडारा ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.