नागपूर : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी २५-५० टक्के कर लादणे हे दबावतंत्र आहे. देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आपण सर्व भारतीयांनी सरकारला पाठिंबा दिला पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्क्यांवरून ५० टक्के कर वाढवला आहे. याला उत्तर देण्यास भारताच्या परराष्ट्र धोरणात अपयश आले आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.

पवार म्हणाले, ” मोदींची डिप्लोमसी अपयशी ठरली आहे का, याबद्दल मी आज काहीही सांगू इच्छित नाही. ट्रम्प साहेबांचे अध्यक्षपदाच्या पहिल्या ५ वर्षात आणि आताही त्यांचे काम आणि दृष्टिकोन आम्ही पाहिले आहे. मला वाटते की त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. ते जे मनात येईल ते बोलतात, त्यामुळे त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी आपले शेजारी देश आपल्यापासून दूर जात आहेत हे दुर्लक्ष करू नये.

“आपण आपल्या शेजारी देशांबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आज पाकिस्तान आपल्या विरोधात आहे, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव आपल्यावर नाराज आहे (नाराज), आपले सर्व शेजारी आपल्यापासून दूर जात आहेत. मला वाटते की मोदी साहेबांनी या पैलूकडे दुर्लक्ष करू नये आणि या दृष्टिकोनात सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करावे,” असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) ओबीसी सेलतर्फे आज क्रांती दिनी राज्यभर मंडल यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार हिरवी झेंडी दाखवणार आहेत. ही यात्रा आशिर्वाद लॉन, सीताबर्डी येथून दुपारी साडेबाराला निघेल. यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित राहतील.

मंडल आयोगाची अंमलबजावणी ही ओबीसींच्या जीवनातील सर्वात मोठी सामाजिक परिवर्तन घडविणारी बाब ठरली. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी मंडल आयोग राज्यात सर्वप्रथम लागू केला होता. शरद पवार यांनी ओबीसीसाठी काय केले, याची माहिती राज्यातील जनतेला व्हावी यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे. मंडल आयोग राज्यात सर्वप्रथम लागू करून शरद पवार यांनी ओबीसी समाजाला अधिकृत व हक्काचे आरक्षण मिळून दिले. ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह देशातील सर्वच विरोधी पक्ष करीत होते. परंतु, भाजपने याला विरोध केला.

दबाव वाढल्याने केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले. परंतु, ही जनगणना कधी करणार याची मात्र, कोणतीही घोषणा केली नाही. भाजपचे ओबीसीविरोधी धोरण आणि शरद पवार यांनी ओबीसी समाजासाठी केलेले कार्य हे जनतेपर्यंत पोचविण्यासाठी ही मंडल यात्रा काढण्यात येत आहे. पहिल्या टप्पात विदर्भातील ११ जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे असे सलिल देशमुख यांनी सांगितले.