बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक भाकरी फिरविली. पक्षातील तरुणतुर्क नरेश शेळके यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांनी सर्वप्रथम जिल्हा राष्ट्रवादीमधील अनेकांना धक्का दिला. मात्र, शेळके यांच्यासह अनेकांना पुन्हा धक्का देत त्यांनी दोन जिल्हाध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला. नुसता निर्णय न घेता आज, बुधवारी अॅड. प्रसेनजीत पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली.

सध्या जिल्हा कार्याध्यक्षपदी कार्यरत असणाऱ्या पाटील यांच्याकडेही जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडे जिल्ह्यातील घाटाखालील भागाची जवाबदारी राहणार आहे. पक्षस्थापनेपासून राष्ट्रवादीच्या आजवरच्या २६ वर्षांच्या कालावधीत प्रथमच पवारांनी दोन जिल्हाध्यक्ष नेमले आहेत. एकसंघ असो वा दोन गटांत विभागलेल्या शिवसेनेने नेहमीच घाटावर व घाटाखाली, असे दोन जिल्हाप्रमुख नेमले. जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार आणि अन्य राजकीय अडचणी लक्षात घेत शिवसेनेने हा ‘फार्म्युला’ वापरला. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनेदेखील लोकसभा निवडणुकीच्या आसपास दोन जिल्हाध्यक्ष नेमले होते.

या पाठोपाठ जिल्ह्याचा विस्तार आणि दोन गटात विभाजल्याने कमकुवत झालेल्या राष्ट्रवादीनेदेखील हाच कित्ता गिरवीला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पाटील यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र दिले. मुंबई येथील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात नियुक्तीपत्र देतेवेळी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या आमदार विद्या चव्हाण, रोहिणी खडसे, रवींद्र पवार, आदि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले पाटील हे घाटाखालील प्रमुख नेते आहेत. भाजपाचे आमदार संजय कुटे यांचे कट्टर विरोधक, अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी दोनदा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात निसटता पराभव स्वीकारून कुटे यांना जेरीस आणले होते. जिल्हा परिषद, बाजार समितीमध्ये त्यांनी सातत्याने विजय मिळविले. राजकारणाबरोबरच सहकारमधील ते एक प्रस्थ समजले जातात. सध्या ते जळगाव जामोद बाजार समितीचे सभापती असून पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष आहेत.

जळगाव मध्ये जल्लोष

प्रसेनजीत पाटील यांची नियुक्ती होताच जळगाव जामोद येथे तहसील चौकामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतषबाजी करीत जल्लोष केला. यावेळी विश्वास भालेराव, प्रमोद सपकाळ, ईरफान खान, रमेश वायझोडे, योगेश कुवर, सतीश तायडे, विशाल वाघ, अक्षय कुनगाडे, योगेश भीसे, आनंद तायडे, जय कागदे, धनंजय सारोकार, शेख जाकिर, अतुल मानकर, अक्षय कोकाटे, राहुल मानकर, एम.डी. रेहान, अतीक भाई, अंकित हेलोडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते