लोकसत्ता टीम

वर्धा : निवडणुकीचा ज्वर विविध घडामोडीमुळे वाढत आहे. प्रत्येक पक्ष संभाव्य उमेदवारची चाचपणी करू लागला आहे. अश्या या इच्छुकांच्या मुलाखतीस वेग येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटानेपण बाह्या सरसावून तयारी सुरू केल्याचे दिसून येते.

लोकसभा निवडणुकीत खासदार निवडून आल्याने आता जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, हिंगणघाट व देवळी या चारही मतदारसंघवार पक्षाने दावा करने सgरू केले. म्हणून रविवारी या सर्व इच्छुकांच्या मुलाखती पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः घेतल्या. प्रत्येक संभाव्य उमेदवारास त्यांचा एक टोकदार प्रश्न प्रामुख्याने राहिला. विधानसभा निवडणूक लढायची आहे तर तयारी काय, जिंकणार कसे असा हा पवारांचा प्रश्न राहल्याचे पुण्यातून परतलेले उमेदवार सांगतात. तयारी कशी करणार, मतदारसंघात जातीय समीकरण कसे, प्रभाव पडणारे घटक कोणते, आजवर कोणते उपक्रम राबविले, कोण मदत करणार अशी प्रश्नांची सरबत्ती होती.

आणखी वाचा-अधिकार आहेत तर मग निर्णय का नाही घेत? न्यायालयाने थेटच विचारले…

इच्छुक उमेदवार समीर देशमुख हे म्हणाले की, पक्षाध्यक्ष पवार यांनी विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिलीत. आजवर आमचा गट प्रत्येक निवडणुकीस सामोरे गेला आहे. पक्ष त्यामुळे सक्रिय राहला. वर्ध्यातून काँग्रेसचा उमेदवार तीन वेळा पराभूत झाला आहे. म्हणून ही जागा पक्षाने लढवावी व आपल्यास उमेदवारी द्यावी, असे म्हणणे मांडल्याचे समीर देशमुख सांगतात. नितेश कराळे यांनी आर्वी व वर्धा या दोन मतदारसंघातून दावा केला. ते म्हणाले की आपण निवडणूक जिंकण्यात यशस्वी कसे ठरणार ते नमूद केले. वर्ध्यात काँग्रेस सातत्याने पराभूत झाल्याने आता राष्ट्रवादीने ही जागा मागितली पाहिजे, असा आग्रह धरल्याचे कराळे सांगतात.

तर हिंगणघाट येथून लढण्यास तयारी ठेवणारे सुधीर कोठारी म्हणाले की आजवर आपण पक्षासाठी काय कार्य केले ते नमूद केले. पालिका, बाजार समिती, बँक याठिकाणी पक्षाचा वरचष्मा ठेवला. तसेच हिंगणघाट बाजार समितीचा नावलौकिक सर्वत्र कायम ठेवण्यात यश आहे. एक अनुभवी नेता म्हणून तिकीट मिळण्याची भूमिका मांडल्याचे कोठारी म्हणाले. याखेरीज सुनील राऊत, शिरीष काळे, अतुल वांदिले, राजू तिमांडे, संदीप किटे तसेच अन्य काही ईच्छुक मुलाखत देऊन आले आहेत.

आणखी वाचा-बनावट नोटा बाळगणे गुन्हा नाही, उच्च न्यायालयाकडून आरोपीला जामीन…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट विधानसभा निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत पुढे आला आहे. चारही मतदारसंघात दावा केला असला तरी किमान दोन जागा लढवायच्याच असा निर्धार पक्षात दिसून येतो.