नागपूरमधील नांगर-कन्हानच्या आठवडी बाजारात गुन्हेगारांनी तलवारी नाचवल्या आणि दुकानांची तोडफोड केली. यानंतर रामटेक मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांनी रस्त्यावरच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं. ते पोलिसांवर संताप व्यक्त करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात आमदार जयस्वाल यांनी नागपूर पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच “मी आज रस्त्यावर झोपणार आहे,” असा इशाराही दिला.
आशिष जयस्वाल पोलिसांना म्हणाले, “तुमच्याकडे काय कायदा-सुव्यवस्था आहे, तुम्ही कशाला ठाणेदार झाले आहात. इथं गुंड तलवार घेऊन फिरत आहेत. तलवार घेऊन दररोज तमाशा सुरू आहे. मी रामटेकहून इथं पोहचलो, तरी तुम्ही इथं पोहचू शकले नाहीत. फक्त पगार घेण्याचं काम करत आहेत. अवैध धंदेवाल्यांकडून पैसे घेतले जात आहेत. दलाली केली जात आहे.”
व्हिडीओ पाहा :
“मी रस्त्यावर झोपणार आहे. गुंड तलवारी घेऊन तमाशा करत होते तेव्हा पोलीस काय करत होते? पोलीस अधीक्षक येऊ द्या. मी आज रस्त्यावर झोपणार आहे. पोलीस भ्रष्ट आहेत. तुम्हाला कोणकोण किती पैसे देतं हे मला माहिती आहे. कोठून वसुली करतात हेही माहिती आहे. रात्रभर अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांकडून पोलीस पैसे घेतात,” असे गंभीर आरोप आशिष जयस्वाल यांनी केले.