बुलढाणा : मागील काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात एकत्र आले आहेत. त्यांनी मुंबईत संयुक्त मोर्च्याची तयारी केली. यांनतर महायुती सरकारने माघार घेत हिंदी सक्तीचा अध्यादेश मागे घेतला. यापाठोपाठ आज, शनिवारी वरळी डोम येथे दोन्ही पक्षांचा संयुक्त विजयोत्सव मेळावा पार पडला. यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार, राज्याचे राजकारण बदलणार, अशा चर्चा रंगल्या. ‘ठाकरे ब्रँड’वरून रान पेटले, महाचर्चा सुरू झाल्या, वाद पेटले. या वादंगात आता बुलढाणा विधानसभा मतदारसंघांचे आक्रमक व वादग्रस्त रोखठोक विधानांसाठी प्रसिद्ध असलेले शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी उडी घेतली आहे.
बहुचर्चित ‘ठाकरे ब्रँड’ची त्यांनी खिल्ली उडवली. त्यांची यासंदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ‘ठाकरे ब्रँड असता तर तेव्हाच विधानसभेच्या २८८ जागा जिंकल्या असत्या, असा मजकूर त्यावर आहे. यावर नेटकऱ्यांच्या उड्या पडत आहेत.
यापूर्वी प्रसिद्धी माध्यमांसोबत त्यांनी लातूर येथे बोलताना ‘ठाकरे ब्रँड’वर खरपूस टीका केली. हे (उद्धव व राज ठाकरे) बंधू मागेच एकत्र आले असते, तर काही तरी झाले असते. मात्र, त्याला आता खूप उशीर झाला आहे. आता ते दोघे कितपत एकत्र येतात, कसे काम करतात, लोकांशी कसा संपर्क साधतात, लोकांसाठी काय करतात, यांवर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. आता राहिला प्रश्न ‘ठाकरे ब्रँड’चा, तर (खरोखरच) ‘ठाकरे ब्रँड’ असता तर हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच एकसंघ शिवसेनाला महाराष्ट्र विधानसभेच्या पैकीच्या पैकी म्हणजे २८८ जागा मिळाल्या असत्या, अशी उपरोधीक टीका त्यांनी केली.
…तर अनेक भाषा शिकायला हव्यात
लातूर जिल्ह्यातील हाडोळती या ठिकाणी संजय गायकवाड यांनी हे वक्तव्य केले. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, फक्त हिंदीचा विषय नाही, जगात आज टिकायचे असेल तर अनेक भाषा शिकायला हव्यात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पंधरा वर्षांपूर्वीच एकत्रित आले असते तर काही फरक पडला असता. परंतु त्यांनी फार उशीर केला. आता ते एकत्रित आल्याने महाराष्ट्रात काही फरक पडेल, असे मला वाटत नाही. ठाकरे नावाचा ब्रँड जर असता बाळासाहेब जिवंत असतानाच २८८ जागा निवडून आल्या असत्या. त्यावेळीही ७०-७४ च्या पुढे शिवसेना जात नव्हती. आता हे दोन भाऊ एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही. वेळ निघून गेली आहे.
पाकिस्तानचा दहशतवाद रोखायचा असेल तर उर्दू अवगत असली पाहिजे
परराज्यात गेल्यावर तिथे आपण मराठीत बोलणार का? असा प्रश्न उपस्थित करून जगात टीकायचे असेल तर सगळ्या भाषा अवगत असल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. पाकिस्तानचा दहशतवाद ओळखायचा, रोखायचा असेल तर आपणाला उर्दू भाषा ही अवगत असली पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
त्याचे थोबाड फोडले पाहिजे
जो कोणी महाराष्ट्रात राहून मराठी बोलण्याची लाज वाटते, असे म्हणतो, त्याचे थोबाड फोडले पाहिजे. मराठीचा अपमान आपण सहन करता कामा नये, असेही आमदार संजय गायकवाड यांनी ठणकावून सांगितले.