नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार गेल्या महिन्यापासून या ना त्या कारणासाठी वादग्रस्त ठरत आहे. आता आणखी एका आमदाराने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका करताना उद्धव ठाकरे यांचा बाप काढला आहे. दरम्यान, काही तासांतच यूटर्न घेत बाळासाहेब ठाकरे आपले बाप असल्याचे म्हटले आहे.गेल्या काही दिवसांमध्ये महायुती सरकारच्या अनेक मंत्र्यांवर विविध आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये मंत्री योगेश कदम, मंत्री माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्या नावाचा समावेश आहे. तर सरकारमध्ये अन्य काही मंत्री सुद्धा आहेत, जे वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहिले आहेत. त्यामुळे वादग्रस्त आणि कलंकित मंत्र्यांविरोधात काल शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने महाराष्ट्रात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी कोणी लुंगी बनियान घातली, कोणी पत्ते खेळले तर एकाने नाचही केला. दरम्यान, ठाकरे गटाच्या आंदोलनावर टीका करताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली.
संजय गायकवाड यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, उबाठाच्या वतीने जे आंदोलन करण्यात आले, तो पक्ष राहिला नाही. त्यांना काही काम राहिलेलं नाही. त्यामुळे ते माझी कॉपी करू शकत नाहीत, कारण मी ओरिजनल आहे. इतकंच काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही, असे वक्तव्य संजय गायकवाड यांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. त्यानंतर उद्धव यांचे ते वडील असले तरी विचाराने बाळासाहेब आमचे बाप आहेत. माध्यमांनी चुकीचा अर्थ घेतला, असा खुलासा आज केला.
संजय गायकवाड म्हणाले की, विरोधी पक्षाने लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवायला हवा. पण ते नको त्या गोष्टीवर आंदोलन करतात. राज्यात फक्त १६ जागा देऊन जनेतेने त्यांना त्यांची जागा दाखविली आहे. जे कधी मातोश्रीमधून बाहेर पडत नव्हते, ते आता बाहेर रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे आता तरी त्यांनी सुधारावं. कारण आम्ही आता महायुतीमध्ये आहोत. भाजपाला त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि मी माझ्या पक्षाचं काम करतोय. सर्व पक्षांना आपापलं काम करण्याचा अधिकार आहे, असेही संजय गायकवाड म्हणाले.
शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांची काल मुंबईत अनोखी वेशभूषा करत कलंकित मंत्र्यांविरोधात आंदोलन केले होते. शिवाजी पार्क येथे आंदोलनकर्त्यांनी नकली नोटा असलेल्या पैशांची बॅग भरून आणली. काही आंदोलनकर्ते बनियन घालून आणि टॉवेल लावून आल्याचे पाहायला मिळाले. तसेच संजय गायकवाड यांनी आमदार निवासस्थानात केलेल्या मारहाणीवरून एका व्यक्तीने लुंगी आणि हातात ग्लब्स घालून संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त केला होता.