यवतमाळ : गाव पुढाऱ्यांसह ग्रामीण जनतेला गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होवू घातल्या आहेत. या अनुषंगाने राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रत्यक्ष गावखेड्यात तयारी सुरू केलेल्या शिवसेनेच्या वतीने आज रविवारी यवतमाळात निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
स्थानिक जांब मार्गावरील एका हॉटेलमध्ये होत असलेल्या शिवसंकल्प प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून शिवसेना पदाधिकाऱ्यांना निवडणुकीची रणनीती शिकविली जाणार आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात शिवसेनेतर्फे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात जवळपास दोन हजार पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण झाले. पक्षात संघटनात्मक फेरबदल करून पक्षाने संजय राठोड यांचे विश्वासू पराग पिंगळे यांच्यावर पश्चिम विदर्भ समन्वयक अशी महत्वाची जबाबदारी दिली. हरिहर लिंगनवार आणि श्रीधर मोहोड यांच्यावर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली तर गजानन डोमाळे, राजुदास जाधव, यशवंत पवार या तिघांना जिल्हा प्रमुख म्हणून तीन भाग वाटून दिले. तसचे तीन महिला जिल्हाप्रमुखही नेमण्यात आल्या. मंत्री संजय राठोड यांचे विशेष कार्य अधिकारी राहिलेले आणि सेवानिवृत्तीनंतर राजकीय क्षेत्रात आलेले संजय हातगावकर यांच्यावर जिल्हा समन्वयक म्हणून महत्वाची जबाबदारी सोपविली.
गेले दोन महिने पक्षात संघटनात्मक फेररचना आणि तळागळातून पक्षबांधणी सुरू होती. सर्व पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित झाल्यानंतर आता, या पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील रणनिती, विजयाची गणिते याबद्दल अधिक सजग करण्यासाठी मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारातून शिवसंकल्प पदाधिकारी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले. राज्यात शिवसेनेच्या वतीने होत असलेले या प्रकारचे हे पहिलेच प्रशिक्षण शिबीर आहे. या शिबिरातील पदाधिकाऱ्यांच्या अनुभवावरून राज्यात इतरत्रही पदाधिकाऱ्यांचे असे प्रशिक्षण होणार असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी होत असलेल्या या शिबिरात पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संघटनात्मक कौशल्य, संवादकौशल्य, समाज माध्यमांचा प्रभावी वापर आणि सामाजिक जबाबदारीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिबिरामध्ये पक्ष संघटन, सामाजिक माध्यमांवरील राजकारणाचा प्रभाव, महिला सहभाग आणि कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक संघटनात्मक बांधणी कौशल्य विकासावर याबाबतही विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबिराचा समारोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या शिवसंकल्प प्रशिक्षण शिबिराचा समारोप होणार आहे. पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. पण त्याच सोबत शिवसैनिकांना काही प्रश्नही पडले आहेत.
पदाधिकाऱ्यांच्या या शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुतीत पक्षासमोर कोणती आव्हानं राहणार आहेत, याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. मात्र या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार की, मैत्रीपूर्ण लढती होतील, की या निवडणुका स्वबळावर लढल्या जातील या प्रश्नांची उत्तरे शिबिरातून मिळाली तर आणखी जोमाने कामाला लागता येईल, असा सूर उमटत आहे.
