अमरावती : महायुतीत अमरावतीच्‍या जागेवरून संघर्ष सुरू असतानाच महाविकास आघाडीतही नाराजीचा सूर उमटू लागला आहे. काँग्रेसने अमरावतीतून आमदार बळवंत वानखडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्‍यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही अमरावतीवर दावा केला आहे. इच्‍छुक उमेदवार दिनेश बुब यांच्‍या समर्थनार्थ शिवसेना ठाकरे गटाच्‍या मेळाव्‍याचे आयोजन अमरावतीत करण्‍यात आले. येत्‍या काही दिवसांत चमत्‍कार घडेल आणि बुब यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळेल, असा आशावाद नेत्‍यांनी व्‍यक्‍त केला.

या मेळाव्‍याला माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार ज्ञानेश्‍वर धाने, संपर्कप्रमुख सुधीर सुर्यवंशी आदी उपस्थित होते. बुब म्‍हणाले, १९९१ पासून शिवसेना अमरावती मतदार संघातून लढत आली आहे. पण, दुर्देवाने हा मतदार संघ शिवसेनेपासून हिरावून घेण्‍यात आला आहे. येथील शिवसेना नेत्‍यांमध्‍ये एकवाक्‍यता राहिली असती, तर ही वेळ आली नसती, पण अजूनही वेळ गेलेली नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्‍याकडे अमरावतीचा हट्ट कायम ठेवू. याचा अर्थ आम्‍ही महाविकास आघाडीच्‍या विरोधात आहोत, असे नाही.

हेही वाचा…वर्धा : मी शंभर टक्के पवारांचा उमेदवार…..काँग्रेसच्या माजी आमदाराने तुतारी….

पक्षप्रमुखांचा निर्णय आमच्‍यायसाठी अंतिम असेल. त्‍यांचा शब्‍द आम्‍ही खाली पडू देणार नाही. चुकीचा, आततायीपणाचा निर्णय आम्‍ही घेणार नाही. अमरावतीच्‍या जागा ही शिवसेनेची आहे आणि या जागेवर शिवसेनेचाच पहिला हक्‍क आहे, असे आपण आधीपासूनच सांगत आलो, पण आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्‍याकडे पाठपुरावा करण्‍यात कमी पडलो, असे मत माजी खासदार अनंत गुढे यांनी व्‍यक्‍त केले.

गुढे यांनी खासदार नवनीत राणा यांच्‍यावर टीका केली. राणा यांना भाजपमधूनच विरोध आहे. ‘जय श्रीराम’ म्‍हणणारे भक्‍तदेखील त्‍यांच्‍या विरोधात गेले आहेत. जर राणा या भाजपच्‍या उमेदवार असतील, तर त्‍यांच्‍या विरोधात बुब हेच सक्षमपणे लढा देऊ शकतील. ही जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी आम्‍ही टोकाचे प्रयत्‍न करणार आहोत, असेही गुढे म्‍हणाले. राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्‍या विरोधात जी भूमिका घेतली, आता त्‍यांची जागा दाखवून देण्‍याची वेळ आली आहे, असे गुढे यांनी सांगितले.

हेही वाचा…रामटेकमधून काँग्रेसच्या रश्मी बर्वे निवडणूक लढणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी आमदार ज्ञानेश्‍वर धाने म्‍हणाले, दोन-तीन दिवसांत चमत्‍कार घडेल आणि दिनेश बुब यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळेल. अमरावती लोकसभेमुळे शिवसेनेचे अस्तित्‍व टिकून होते. शिवसेनेच्‍या मदतीशिवाय नवनीत राणा यांना पराभूत करणे शक्‍य नाही, असेही त्‍यांनी सांगितले.