लोकसत्ता टीम

अकोला : ‘एनडीए’चा केंद्र सरकारमध्ये सत्तास्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता मंत्रिपदांची माळ कुणाच्या गळात पडणार आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. ‘एनडीए’मध्ये शिवसेना शिंदे गट महत्त्वपूर्ण घटक पक्ष आहे. महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांचे सात खासदार निवडून आल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला दोन जागा मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. त्यामुळे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदाची संधी द्या, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी एका पत्राद्वारे केली.

लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेची ताकद महाराष्ट्रात दिसून आली आहे. राज्यात शिवसेनेचे सात खासदार निवडून आले. राज्यातील भाजपचे खासदार निवडून आणण्यात देखील शिवसेनेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये शिवसेनेला किमान दोन मंत्रिपदे मिळण्याची गरज आहे. ते मिळतीच याचा विश्वास देखील आहे. कल्याण-डोंबिवलीचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, विदर्भातील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची नावे मंत्रिपदासाठी पक्षाकडून दिली जावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे रामेश्वर पवळ यांनी पत्रात म्हटले आहे.

आणखी वाचा-अकोला : पराभवाची परंपरा अबाधित, मात्र जनाधार वाढला, साडेतीन दशकानंतर काँग्रेस…

डॉ. श्रीकांत शिंदे यांचे जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये आकर्षण आहे. त्यांना पक्षाने मंत्रिपदाची संधी दिल्यास युवा नेतृत्वाला संधी देणारा हा पक्ष आहे, अशी प्रतिमा जनमानात निर्माण होईल. महाराष्ट्राच्या विकासाविषयीची त्यांची तळमळ दिसून येते. मंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांच्या विकासदृष्टीचा विस्तार करावा, अशी जनभावना आहे. याशिवाय खासदार प्रतापराव जाधव यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाल्यास विदर्भ आणि मराठवाड्यात पक्षाला बळकटी मिळू शकेल. प्रतापराव जाधव चौथ्यांदा लोकसभेवर निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांनी तीनवेळा विधानसभेवर प्रतिनिधित्व केले.

राज्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला होता. या अनुभवाचा पक्षाला निश्चितच फायदा होईल. मंत्रिपदासाठी त्यांचा विचार प्रामुख्याने करण्यात यावा, असे पवळ यांनी पत्रात नमूद केले. आता शिंदे गटाकडून नेमकी कुणाला संधी दिली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आणखी वाचा-धरणांमधील जलसाठा होतोय कमी, अमरावती विभागात टँकरची शंभरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भाच्या वाट्याला किती मंत्रिपद?

नरेंद्र मोदी सरकार तीनमध्ये विदर्भाच्या वाट्याला किती मंत्रिपद मिळणार, यावरून चर्चा रंगू लागली आहे. विदर्भातील १० पैकी केवळ तीन मतदारसंघात महायुतीला यश मिळाले. नागपूर व अकोला येथे भाजप, तर बुलडाण्यातून शिवसेना शिंदे गट विजयी झाला. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे मंत्रिमंडळात स्थान निश्चित असून आणखी कुणाला संधी मिळते, याकडे विदर्भवासियांचे लक्ष राहणार आहे.