बुलढाणा : दादर येथे दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची काही अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने निषेध करण्यात आला. बुलढाणा शहरात निषेध आंदोलन करून मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला, तर जळगाव जामोद येथे निदर्शने करण्यात आली.

बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे आज, बुधवार १७ सप्टेंबरला निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करून आपल्या भावना व्यक्त केल्या. आंदोलनकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

कोलमडलेल्या कायदा-सुव्यवस्थेमुळे राज्यात माणसंच नाही तर पुतळे देखील असुरक्षित झाले आहेत. दादर येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांना अटक करावी आणि कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज बुलढाणा जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तसेच मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला.

आंदोलनात उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, विजय इतवारे, डी.एस. लहाने अशोक गव्हाणे, विधानसभा सहसंपर्कप्रमुख अनिल नरोटे, शहर प्रमुख नारायण हेलगे, सुमित सरदार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख विजया खडसान, संजय शिंदे, राहुल जाधव, रुपाली चौधरी, संजय गवळी, प्रसिद्धीप्रमुख गजानन धांडे, मोहम्मद सोफियान, शेख रफिक, लक्ष्मी बकतवर, अनिकेत गवळी, अनिता गायकवाड, निर्मला खरात, गोदावरी काळे, रत्ना शेळके, शुभांगी बाहेकर, वर्षा खरात, रेवती बाहेकर उपस्थित होते.

आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले. दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यात पूर्णतः अपयशी ठरले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

‘हा तर राज्याची संस्कृती, स्त्रित्वाचा अवमान’

यावेळी शिवसेना प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी सांगितले की, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा व स्त्रीशक्तीचा अपमान आहे. अशा प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा

माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी जळगाव जामोद येथे ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून आले. येथील शिवसैनिकांनी तीव्र निदर्शने करून घोषणाबाजी केली. जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.