नागपूर : लोकसभेचे पाच वेळा निवडून आलेली रामटेक लोकसभा मतदारसंघाची पारंपरिक जागा आम्ही काँग्रेससाठी सोडली. काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यानी प्रयत्न केले. त्यामुळे रामटेक लोकसभा मतदार संघातील सहापैकी चार विधानसभा जागावर आमचा दावा असणार असल्याचे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व विदर्भाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पूर्व विदर्भाच्या कार्यकर्त्याच्या बैठकीसाठी भास्कर जाधव नागपुरात आले असता ते बोलत होते. महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूरची, अमरावतीची जागा आम्ही सोडली. अनेक जागा आमच्याकडे असताना त्या आम्ही आघाडीतील पक्षासाठी सोडलेल्या आहे. त्याची नोंद महाराष्ट्राच्या जनतेकडे आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे सुद्धा नोंद आहे. विधानभा निवडणुकीत आता ज्या जागा शिवसेनेकडे होत्या त्या जागेवर आम्ही लढणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही असेही जाधव म्हणाले. आम्ही महाविकास आघाडीतर्फे लढणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. पण प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आमच्यासारख्या नेत्यांचे ते काम असून आम्ही पक्षाच्या बैठकी घेत आहे. मात्र आम्ही महाविकास आघाडीतून लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : वर्धा: रेल्वे स्थानकावर आगीचा भडका, गंभीर दुर्घटना टळली; मात्र…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय शिरसाट जे बोलतात ते भाजपला सहन होत नाही. कारण भाजपला स्वतःला मोठे व्हायचे आहे. पस्तीस वर्षाच्या शिवसेनेने त्यांच्यासोबत मैत्री निभवली आणि त्यांना संपवण्याचा घाट घातला. या विचारांच्या आणि दृष्टीची फळ ते आज भोगत आहे. १९९० पासून पहिल्यांदा मुंबईच्या बाहेर शिवसेना निवडणुका लढल्या. त्यावेळी सर्वात जास्त आमदार हे शिवसेनेचे निवडून आले होते. भाजपचे नाही. हळू हळू भाजपने मैत्रीच्या नावाखाली आमचे उमेदवार पाडण्याचे काम केले. भाजपाचा हातखंडा आहे हे आमच्या लक्षात आले नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पूर्वीचे वैभव परत मिळवेल असेही जाधव म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या योजना आम्ही बंद पाडल्या नाही. अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते मात्र त्यांच्या योजना राबविल्या आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय अज्ञान असल्यामुळे ते काही बोलतात अशी टीका जाधव यांनी केली.