scorecardresearch

राज्यात वीज मीटरचा तुटवडा; नव्या जोडणीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा; खुल्या बाजारात ग्राहकांची लूट

राज्यातील काही भागात वीज मीटरचा तुटवडा आहे. त्यामुळे नवीन ग्राहकांना बाजारातून मीटर दुप्पटीहून अधिक किंमतीत घ्यावे लागत आहेत.

महेश बोकडे

नागपूर : राज्यातील काही भागात वीज मीटरचा तुटवडा आहे. त्यामुळे नवीन ग्राहकांना बाजारातून मीटर दुप्पटीहून अधिक किंमतीत घ्यावे लागत आहेत. यातून ग्राहकांची लूट सुरू आहे. राज्यात ५० कोटींच्या जवळपास वीज ग्राहक आहेत. यापैकी अनेकांना नवीन बिघाडामुळे नवीन हवे असते. याशिवाय नवीन जोडणीसाठीची प्रतीक्षा यादीही मोठी असते. मध्यंतरी नागपुरातही असाच अनुभव आला.

पुरवठय़ाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने अद्यापही प्रतीक्षा यादी कायम आहे. दरम्यान महावितरणने ग्राहकांना खुल्या बाजारातूनही नवीन मीटर खरेदी करण्याची मुभा दिली आहे. हे मीटर महावितरणच्या चाचणी प्रयोगशाळेत तपासल्यावर लावून दिले जातात. सध्या हे मीटर नेहमी उपलब्ध होणाऱ्या रकमेच्या तुलनेत खूप जास्त किंमतीत ग्राहकांना घ्यावे लागत आहेत. 

नागपुरातील स्वावलंबी नगरच्या एका ग्राहकाने थ्री फेज मीटर ३,३०० रुपयांत घेतले. दुसऱ्या एका ग्राहकाला हे मीटर ४ हजार रुपयांत दिले गेले. परंतु नागपुरात तूर्तास आवश्यक संख्येने मीटर उपलब्ध असल्याचा दावा येथील जनसंपर्क अधिकारी प्रवीण स्थुल यांनी केला आहे.

महावितरणकडून कमी परतावा..

वीज ग्राहकांनी खुल्या बाजारातून मीटर खरेदी केल्यावर महावितरणकडून ग्राहकांना विशिष्ट रकमेचा परतावा दिला जातो. त्यानुसार सिंगल फेज मीटर असल्यास महावितरण ग्राहकाला ८५० रुपये तर थ्री फेज मीटर असल्यास १,५२० रुपये परतावा देते. परंतु प्रत्यक्षात याहून दुप्पटीहून जास्त किमतीत ग्राहकांना मीटर खुल्या बाजारातून घ्यावे लागत असल्याने ग्राहकांवर अतिरिक्त भार पडत आहे.

दरबदल..  आधी सिंगल फेज मीटर

खुल्या बाजारात १,५०० तर थ्री फेज २,३०० रुपयांच्या जवळपास मिळत होते. परंतु आता सिंगल फेज मीटर काही दुकानदारांकडून ३ हजारापर्यंत तर थ्री फेज मीटर ४ हजार रुपयापर्यंत विकले जात आहेत.

‘‘मध्यंतरी महावितरणकडे वीज मीटरचा तुटवडा होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत तातडीने सर्वत्र मीटर उपलब्ध केले. एखाद्या भागात कमतरता असल्यास तेथे मीटर उपलब्ध केले जातील. लवकरच महावितरणला मोठय़ा संख्येने मीटर उपलब्ध होणार आहेत.’’

– अनिल कांबळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मुंबई.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shortage electricity meters state long new connection robbery consumers open market ysh

ताज्या बातम्या