लोकसत्ता टीम

बुलढाणा : मंत्रालयातील तीस वर्षाच्या दीर्घ प्रशासकीय सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतल्याबद्धल सिद्धार्थ खरात यांचा सेवा गौरव सोहळा बुलढाणा येथे पार पडला. हा सोहळा शासकीय धोरणावरील टीकास्त्र, परखड मतप्रदर्शन आणि सत्कार मूर्तीसह उपस्थित मान्यवरांच्या निर्भीड अभिव्यक्ती, मनोगतांनी चांगलाच गाजला. याचबरोबर दोघा अधिकाऱ्यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिल्याने या सत्कार सोहळ्याचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची चिन्हे आहेत.

बिकट परिस्थितीतून गृह मंत्रालयाचे माजी सहसचीव या पदापर्यंत मजल मारणारे सिद्धार्थ खरात यांचा सेवा गौरव सोहळा बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या गोवर्धन सभागृहात पार पडला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी जमली होती. काल रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक होते. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, ‘बारोमास कार ‘ सदानंद देशमुख, स्वेच्छानिवृत्त उप जिल्हाधिकारीद्वय सुनील शेळके, दिनेश गीते, गोखले इन्स्टिट्यूटचे डॉक्टर नरेश बोडखे, सेवा निवृत्त अभियंता डी. टी. शिपणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आणखी वाचा-३३ टक्के आरक्षणासाठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यां रस्त्यावर

वन, पुरातत्वचा कारभारच अजब : चांडक

अध्यक्षीय मनोगतात चांडक यांनी खरात याना भावी काळासाठी शुभेच्छा देत शासकीय कार्यपद्धतीचा परखड समाचार घेतला. पुरातत्व आणि वन विभाग स्वतःही काही करत नाही आणि इतरांनाही काही करू देत नाही, असा टोला त्यांनी लगावला. नियमांच्या कचाट्यात अडकल्याने दोन्ही विभागाची फरपट होतेच पण विकासालाही खिळ बसत आहे.लोणार मध्ये जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ निर्माण झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून सध्या तिथे दुरवस्था झाल्याचे ते म्हणाले.

पक्ष स्थापन करा वा बटीक व्हा : खेडेकर

पुरुषोत्तम खेडेकरांनी मनोगतातून खरात, गीते यांना रोखठोक सल्ला दिला.स्वेच्छा निवृत्तीनंतर ताकाला जाऊन गाडगे लपविण्यापेक्षा राजकीय मैदानात उडी घ्या. राजकीय पक्षांची गुलामगिरी स्वीकारण्यापेक्षा महाराष्ट्राचा दौरा करून विधानसभेच्या २८८ जागा लढा. पक्ष स्थापन करून उमेदवार उभे करा वा राजकीय पक्षांचे बटिक म्हणून काम करावे लागेल, अश्या शब्दात त्यांनी खडे बोल सुनावले.

आणखी वाचा-शंभर वर्ष जुन्या इमारतीचा व्यावसायिक वापर, उच्च न्यायालयात प्रकरण…

मागील दहा वर्षात जे भोगले…

देश आणि जनतेने मागील दहा वर्षात जे भोगले ते ते कुणासाठीच आनंददायक नाही, अशी जहाल टीका सिद्धार्थ खरात नामोल्लेख न करता केंद्र सरकारवर केली. देश आणि महाराष्ट्राची संस्कृती, वैभव, लोकशाहीतील संस्था कमकुवत झाल्या. राज्यातील संस्कृतीचा बट्ट्याबोळ झाला, नैतिक अधपतन झाले असून राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचा रेतीघाट करून टाकला आहे.

शेतकरी समस्या, आत्महत्यावर तोडगा काढण्यास शासन, प्रशासन कुचकामी ठरले. ही कोंडी फोडण्यासाठी, चित्र बदलण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे . आपण त्यासाठी ‘तयार’ असल्याचे सांगून त्यांनी आपल्या राजकीय क्षेत्रात प्रवेशाचे संकेत दिले. इतर मान्यवरांनी त्यांना राजकीय पदार्पणसाठी शुभेच्छा देत त्यांनी मेहकर मधून आमदारकीची निवडणूक लढावी अशी जोरकस मागणी केली.

आणखी वाचा-जेईई मेन्स परीक्षेत एकाच विद्यार्थ्याला वेगवेगळे गुण,‘एनटीए’ला उच्च न्यायालयाची नोटीस

सुनील शेळके यानी सिध्दार्थ खरात याच्या दीर्घ सेवेचा गौरव पूर्ण उल्लेख केला. राजकीय क्षेत्रातही ते यशस्वी ठरतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. दिनेश गीते यांनी सिंदखेडराजा व लोणार चा विकास खुंटल्याचे सांगून त्यासाठी आपण ‘पुढाकार घेणार ‘असल्याचे सांगितले. अप्रत्यक्षपणे त्यांनी सिंदखेडराजा मतदारसंघातून लढण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संचालन पत्रकार राजेंद्र काळे तर आभार ॲड. जयसिंगराजे देशमुख यांनी मानले.आयोजनासाठी पुरुषोत्तम बोर्डे, सुनील सपकाळ, रविंद्र साळवे, प्रविण गीते, सोहम घाडगे, बाबासाहेब जाधव यानी परिश्रम घेतले. जिल्ह्याच्या वतीने सन्मानपत्र, महात्मा फुले यांची पगडी देऊन खरात यांचा सहपत्निक सत्कार करण्यात आला.