भंडारा: शाळेतून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पुलावरून उलटल्याने सहा ते सात विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे शासनाच्या परिपत्रकानुसार कालपासून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. असे असताना सीबीएसई शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले गेले.
सीबीएसई शाळा कायमच शासनाच्या नियमाची पायमल्ली करीत असल्याने विद्यार्थ्यांना अनेकदा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागते . आज घडलेल्या या अपघातानंतर खराब रस्ते आणि खाजगी शाळांचा मनमर्जी कारभार याबद्दल पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील रस्त्यांची दुर्दशा सर्वश्रुत आहे. रस्त्यांची डागडुजी केली जावी यासाठी कायम लोकांची ओरड असते. परंतु प्रशासनाकडून हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही. याचा परिणाम आज शाळेच्या विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागला. कारधा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांची शाळा सुटल्यानंतर काही विद्यार्थ्यांना घेऊन मारोती ओमनी व्हॅन भंडारा तालुक्यातील मांडवी,माटोरा, खमारी येथील विद्यार्थी सोडवण्यासाठी भिलेवाडा सूरेवाडा मार्गाने जात होती. दरम्यान या मार्गावर असलेल्या पुलाजवळ रस्ता आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गाडी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला कोसळली.
यात स्कूल व्हॅन मधील अवेंद्र भोयर, सानिध्या चोपकर, उर्वेश बेदरकर, सानवी बेदरकर, रुद्रानी बेदरकर, गर्ग मेश्राम मेश्राम व गाडीचा चालक उमेश मेश्राम जखमी झाले. घटनेनंतर रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांनी मदतीला धावून जात विद्यार्थ्यांना गाडी बाहेर काढले. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झाली नाही. मात्र पुन्हा एकदा खराब रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले.
सुट्टीच्या आदेशाची पायमल्ली
शासनाच्या परिपत्रकानुसार १६ ते ३१ ऑक्टोबर पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या देण्याचे आदेश आहेत. असे असताना आज आणि उद्या देखील खाजगी शाळा सुरू ठेवण्यात आले आहेत. शासन परिपत्रकाची तमा न बाळगणाऱ्या खाजगी शाळांवर कोणतेही कारवाई होत नसल्याने वारंवार अशा घटना घडत असल्याचे पालकांनी रोष व्यक्त केला आहे.
जबाबदार कोण
रस्त्याची दुरावस्था खाजगी शाळांची मनमर्जी यामुळे आज ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी विद्यार्थ्यांना अशाप्रकारे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.