चिखली तालुक्यातील रोहडा येथील तपोवन देवी मंदिर परिसरातून बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय बालिकेचा तब्बल २८ तासांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेहच हाती लागला. तिचा चेहरा दगडाने ठेचलेला आढळून आल्याने खळबळ उडाली असून समाजमन सुन्न झाले आहे.

हेही वाचा >>> नागपूर : समृद्धी’वर अतिवेगाने वाहन चालवाल तर…खबरदार! ५०० वाहनांवर कारवाई

राधिका विलास इंगळे (६) असे मृत बालिकेचे नाव आहे. मूळची बाळापूर (जि. अकोला) येथील रहिवासी असलेल्या या दुर्देवी बालिकेचा मृतदेह तपोवन मंदिर परिसरातील मागील डोंगराळ भागात आढळून आला. बाळापूर येथील रहिवासी विलास इंगळे लग्नानिमित्त सहपरिवार चिखली परिसरात आले होते. १२ मे रोजी सकाळी ११ वाजतापासून राधिका बेपत्ता होती. पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी कसोशीने प्रयत्न केले. दरम्यान, आज शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास तपोवन देवी मंदिराच्या मागील भागात तिचा मृतदेह आढळून आला. तिचा चेहरा पूर्णपणे ठेचलेला आहे. या निष्पाप बालिकेची निर्घृण हत्या कोणी व कोणत्या हेतूने केली, याचा शोध घेण्याचे आव्हान चिखली पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.