यवतमाळ : महागाव तालुक्यात एका सामाजिक कार्यकर्त्याने तालुक्यात फोफावलेल्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांना निवेदन देवून कारवाईची मागणी केली होती. हे निवेदन द्यायला गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षकाने अमानुष मारहाणीची घटना घडली होती. या घटनेची वरिष्ठांमार्फत चौकशी करण्यात येत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांने न्यायासाठी थेट पोलीस ठाण्यातच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >>> अकोला जिल्ह्याला अंमली पदार्थांचा फास, वर्षभरात तब्बल ३६ गुन्हे

महागाव पोलीस ठाण्यात आज बुधवारी सकाळी ११ वाजता घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. तालुक्यातील कलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान श्रीराम राऊत यांनी महागाव तालुक्यात फोफावलेल्या अवैध धंद्यांविरोधात महागाव पोलिसांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. हे अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांनी काय कारवाई केली, याची माहिती घेण्यासाठी सामधान राऊत १३ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात गेले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक देविदास पाटील यांनी तक्रारदाराचे समाधान न करता उलट त्यांनाच अश्लील शिवीगाळ करीत अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. राऊत यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून कोठडीत डांबण्याची धमकीही पोलीस निरीक्षकांनी दिल्याचा आरोप आहे. हा सर्व प्रकार ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संकलित झाला. पीडीत सामाजिक कार्यकर्त्याने १४ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना घडलेल्या घटनेबद्दल निवेदन पाठवून मारहाणीच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली होती. सहायक पोलीस निरीक्षक देविदास पाटील यांच्यावर कार्यवाही न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही समाधान राऊत यांनी दिला होता.

हेही वाचा >>> चौथी-पाचवीतील बालमित्र धरणात पोहायला गेले अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंधरवाडा उलटला तरी पोलीस प्रशासनाने तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे राऊत हे आज सकाळी पेट्रोल भरलेली बॉटल घेऊन पोलीस ठाण्यात पोहचले. कोणाला काही कळण्याअधीच त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून राऊत यांना आत्मदहनापासून परावृत्त केले. राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष प्रमोद जाधव, अंकुश शेतकरी संघटनेचे ॲड. गजेंद्र देशमुख व इतरांशीही सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी यापूर्वी हुज्जत घातल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान समाधान राऊत यांना ठाण्यातच मारहाण केल्याचा पुरावा तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. मात्र ते फुटेज डिलिट करण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्या घटनेवेळी सीसीटीव्ही बंद होते असे कारण आता महागाव पोलिसांकडून देण्यात येत आहे. या सर्व प्रकरणाची पोलीस अधीक्षकांनी चौकशी करावी, अशी मागणी अॅड. गजेंद्र देशमुख यांनी केली आहे.