नागपूर: प्रवासादरम्यान रस्त्यांवर वाया जाणारा वेळ आणि अपघातांची जोखीम टाळण्यासाठी अनेकजण रेल्वे प्रवासाचा पर्याय निवडतात. मात्र दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात प्रवास करणाऱ्या ११६६ जणांना हा पर्याय निवडणे महागात पडले आहे. प्रवासात चोरीला गेलेल्या त्यांच्या साहित्यापैकी ११ टक्केच एवज लोहमार्ग पोलीस शोधू शकले आहेत. म्हणजे १२८ जणांचा चोरीला गेलेला मुद्देमाल शोधण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले. चोरीला गेलेल्या १०३८ वस्तू आजही लोहमार्ग पोलीस शोधू शकलेले नाहीत. त्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान होणारी चोरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

चालू २०२५ या वर्षात दक्षिण मध्य पूर्व रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारितील मार्गांवर प्रवास करणाऱ्या ११६६ जणांच्या साहित्याची चोरी झाली. चोरीला गेलेल्या या साहित्यात ८५ टक्के वस्तू या भ्रमणदूरध्वनी, टॅबलेट अथवा लॅपटॉप सारख्या इलेक्ट्रॉनिक होत्या, असे लोहमार्ग पोलिसांची डायरी म्हणते. त्यातील केवळ ११० चोरींचा तपास करून या वस्तू लोहमार्ग पोलीस मूळ मालकापर्यंत पोचवू शकले. प्रवासादरम्यान चोरीला गेलेल्या एकूण ९९१ इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स पैकी जेमतेम ११७ ई गॅझेट्सचा लोहमार्ग पोलीस छडा लावू शकले. चोरीला गेलेल्या बॅग्जमधील उर्वरित रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू आजवर प्रवाशांना परत मिळू शकलेल्या नाहीत.

केंद्र सरकारच्या सर्वांत मोठ्या जाळ्यांपैकी एक रेल्वे प्रशासनाची दोन सर्वांत मोठी विभागीय कार्यक्षेत्र नागपूरात आहेत. दक्षिण- मध्य– पूर्व रेल्वे (द.म.पू. रे) आणि दक्षिण मध्य रेल्वे (द.म.रे) प्रशासनाची परिक्षेत्र मंडळातील पोलिसांची विभागीय मुख्यालये देखील नागपुरात आहेत. या दोन्ही विभागांच्या विभागीय व्यवस्थापकांचे मुख्यालय देखील नागपूर आहे. त्यामुळे रेल्वेच्या विस्तारात देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूरचे स्थान महत्त्वाचे आहे.

अशी आहे दक्षिण मध्य पूर्व रेल्वे पोलीस हद्द

तब्बल १ हजार चौरस किलोमिटर परिसराचा परिघात दक्षिण- मध्य – पूर्व रेल्वेच्या लोहमार्ग पोलिसांची हद्द विस्तारली आहे. नागपूर ते चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह, अमरावती जिल्ह्यातील बडनेरा, यवतमाळ जिल्ह्यातील पिपळखुटी ते नागपूरपासून मध्य प्रदेशातील इटारसी आणि छिंदवाडा पर्यंत विस्तारली आहे. या रेल्वे पोलिस सुरक्षा बलाच्या अखत्यारित ९३ हून अधिक रेल्वे स्थानके कार्यरत आहेत. या स्थानकांशी निगडीत केंद्र सरकारच्या लोहमार्ग मंत्रालयाशी संबंधीत सर्व चल आणि स्थावर मालमत्तेचे संरक्षण हे लोहमार्ग सुरक्षा बलाची जबाबदारी आहे.

सीसीटीव्हीचे जाळे विस्तारले

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या साहित्याची चोरी रोखण्यासाठी सीसीटीव्हीचे जाळे विस्तारले जात आहे. गाड्यांमध्ये देखील त्यांची संख्या वाढविली जात आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे मार्गांवर विशेष पाळत ठेवली जाते, असे वरिष्ठ विभागीय पोलिस आयुक्त (दक्षिण मध्य रेल्वे आर. पी. एफ.)मनोज कुमार म्हणाले.