अकोला : पंढरपूर यात्रेसाठी भक्तांच्या सेवेत लालपरी संपूर्ण क्षमतेने धावणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आतापासूनच अतिरिक्त बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातून पंढरपूरसाठी तब्बल २०० बस गाड्या चालवण्यात येणार आहेत.

यंदा आषाढी एकादशी महोत्सव २९ जून रोजी आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातून देखील भाविक मोठ्या संख्येने जातात. पंढरपूर यात्रेनिमित्त एसटी गाड्यांमध्ये भाविकांची गर्दी उसळते. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी बस गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येतात. यात्रेच्या काळात महामंडळाच्या उत्पन्नात देखील भरीव वाढ होते. अकोला विभागातील प्रवाशांच्या सुविधेसाठी पंढरपूर यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. २९ जूनच्या एकादशीसाठी १५ जूनपासूनच पंढरपूर यात्रा विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ५ जुलैपर्यंत बसेसच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत.

हेही वाचा >>> वर्धा : निधी परत घेण्याची भाजप आमदार केचे यांची मागणी, तेली समाजात रोष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अकोला विभागातील एकूण नऊ आगारातून एकूण २०० बस प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मागील वर्षी १७७ गाड्या पंढरपूर यात्रेसाठी सोडण्यात आल्या होत्या. यावर्षी २०० गाड्यांचे नियोजन केले आहे. सध्या एसटीमध्ये ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास आहे. तसेच महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत आहे. इतरही सुविधा प्रवाशांना आहेत. त्यामुळे प्रचंड गर्दी उळण्याची शक्यता आहे. याचा विचार यंदा बस गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.