लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या (एसटी) अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त शनिवारी  (३ जून २०२३) नागपूरसह राज्यभरातील बस स्थानकांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ओरिसातील रेल्वेच्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर हे सर्व कार्यक्रम एसटीने रद्द केले आहे.

मुंबईला दुपारी ११:३० वाजता, यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईंट, मुंबई येथील कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार होते. तर प्रत्येक एसटी बस स्थानकावर विविध उपक्रम राबवले जाणार होते. त्यात शनिवारी सर्व आगार व बसस्थानकावर सडा घालून रांगोळी काढून, झेंडूची फुले, आंब्याची पाने यांची तोरण बांधने, दर्शनी बाजूस केळीचे खांबाने स्वागत कमानी उभारणे, आगारातील प्रत्येक बस स्वच्छ धुवून मार्गस्थ काढणे, ६ बाय ३ फुट आकाराचे कापडी फलक तयार करुन बसस्थानकाच्या इमारतीच्या दर्शनी भागात प्रदर्शित करणे,  सकाळी १० वाजता सर्व प्रवाशी व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्याचा समावेश होता. परंतु एसटी महामंडळाने हे कार्यसक्रम रद्द केले आहे.

हेही वाचा… Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातस्थळी हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर घालत आहेत घिरट्या, कारण जाणून घ्या…

एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितले की, ओरिसा राज्यात घडलेली रेल्वे दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्यात अनेक प्रवाशांची जीवितहानी झालेले आहे.  मृत पावलेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री महोदय यांनी श्रध्दांजली वाहिली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदय यांनी आजचे एसटी महामंडळाचे अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमीत्त्य आयोजित सर्व कार्यक्रम स्थगित केले आहेत. हे कार्यक्रम पुढील कालावधीत घेण्यात येतील.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St cancelled the amrit mahotsav anniversary event due to train accident in orissa mnb 82 dvr
First published on: 03-06-2023 at 13:51 IST