लोकसत्ता टीम

बुलढाणा : महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने मंगळवार, ३ सप्टेंबर पासून पुकारण्यात आलेले आंदोलन दुसऱ्या दिवशीही कायम आहे. जिल्ह्यातील एसटी कामगार आणि कर्मचारी बहुसंख्येने सहभागी झाले. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील एसटी बस वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. यापरिणामी ऐन सणासुदीच्या काळात जिल्ह्यातील लाखावर प्रावाश्यांची प्रचंड गैरसोय आणि हाल होत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात सात एसटी बस आगार आहेत. यामध्ये बुलढाणा, चिखली, मेहकर, जळगाव जामोद, खामगाव, शेगाव आणि मलकापूर आगारचा समावेश आहे. एसटी महामंडळ च्या वरीष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सात आगारातून दररोज, तीनशे चाळीस ते साडे तीनशे ‘शेड्यूल’ राहतात.यातून दररोज लाखाच्या आसपास आबालवृद्ध प्रवासी प्रवास करतात. यामध्ये नियमित प्रवासी, विद्यार्थी, येजा( अप डाऊन) करणारे कर्मचारी, कामगार, व्यावसायिक, प्रतिष्ठान मधील खाजगी कर्मचारी यांचा समावेश आहे.

आणखी वाचा-पुतळ्यांवरून वाद! बुलढाण्यात शिवसेना-काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली…

महिलांना प्रवासी भाड्यात पन्नास टक्के सवलत देण्यात आल्याने महिला प्रवाश्यांची संख्या भरमसाठ वाढली आहे. बसमधील महिला प्रवाश्यांची टक्केवारी साठ ते सत्तर टक्क्यांवर गेल्याचे दैनिक चित्र आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाने सात आगारातील बस वाहतूक जवळपास ठप्प झाल्याने या प्रवाशाचे मंगळवारी, ३ सप्टेंबर रोजी बेहाल झाले.बहुतेक जणांना आंदोलनाची कल्पना नसल्याने त्यांना ताटकळत बसण्याची पाळी आली. कामाचा खोळंबा झाला तो वेगळाच! आज बुधवारी देखील असेच चित्र आहे. यामुळे खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांचे उखळ पांढरे होत आहे. याचा फटका एसटी महामंडळाच्या बुलढाणा विभागाला बसला असून एकाच दिवसात लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाल्याचे सूत्रांनी सांगितले.

आंदोलन यशस्वी; कृती समितीचा दावा

दरम्यान आजच्या आंदोलनात बहुसंख्येने कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. बुलढाणा येथील विभाग नियंत्रक कार्यलय, विभागीय कार्यशाळा यासह सात आगारातील चालक , वाहक, प्रशासकीय कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. या सर्व संवर्गातील मिळून हजेरी बुक वर २१४२ कर्मचारी आहेत. त्यापैकी १४४० कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहे. त्यापैकी (हजेरी बुक नुसार)हजर असलेल्यांची संख्या ५८४ असली तरी ते साप्ताहिक सुट्टी, दौऱ्यावर आहेत. तसेच १५४ जण अधिकृत रजेवर आहेत. वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी ही माहिती दिली.

आणखी वाचा-नागपुरात खड्डयांच्या विरोधात मानवी श्रृंखला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंदोलन कशासाठी?

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध आर्थिक मागण्या, त्याकडे शासन आणि महामंडळ व्यवस्थापनाचे होणारे दुर्लक्ष याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. महामंडळातील विविध कामगार संघटनांनी एकत्र येऊन विविध टप्प्यातील आंदोलन पुकारले आहे. राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतन वाढ, कामगार करार नुसार महागाई भत्ता ची अंमलबजावणी, मूळ वेतनातील विसंगती दूर करावी आदी प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. १९ जून २०२४ रोजी सर्व संघटनांची बैठक होऊन ९ व १० जुलै रोजी मुंबई येथील आझाद मैदानात राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. ७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वरिष्ठ अधिकारी आणि संयुक्त कृती समिती यांची बैठक पार पडली. मात्र त्यातून काही मिळाल्याने २३ ऑगस्ट रोजी राज्य भरात कर्मचार्यांनी निदर्शने केली.यापाठोपाठ काल ३ सप्टेंबर पासून तीव्र आंदोलन सुरू करण्यात आले आहे.