लोकसत्ता टीम

नागपूर: गरिबांच्या वस्तीत राहणाऱ्या पल्लवी चिंचखेडे हिने कठीण परिस्थितीत भरारी घेत भारतीय प्रशासकीय सेवेची (आयएएस) परीक्षा उत्तीर्ण केली. तिचे वडील रंगकाम तर आई शिलाई काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या मुलीच्या संघर्षाबाबत आपण जाणून घेऊ या.

अमरावती कॅम्प विभागातील बिच्छू टेकडी, चपराशी पुरा या झोपडपट्टीत राहणाऱ्या पल्लवी देवीदास चिंचखेडे असे युपीएससीची आयएएस परीक्षा उत्तीर्ण केलेल्या मुलीचे नाव आहे. तिचे वडील रंगकाम तर आई शिलाई काम करून उदरनिर्वाह करतात. आताही पल्लवीच्या घराला जायला रस्ता नाही. पल्लवी सातवीत असतांना मिशन आयएएस अमरावती या संस्थेने आयोजित केलेल्या तुकाराम मुंढे या सनदी अधिकाऱ्याच्या कार्यक्रमात वडिलांसह गेली होती. येथूनच तिला सनदी अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली.

दरम्यान पल्लवी डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी मध्ये गेली. येथे तिची संस्थेचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्याशी भेट झाली. पल्लवीने त्यांचे मार्गदर्शन घेतले. प्रा. काठोळे यांनी तिला स्पर्धा परीक्षेची काही पुस्तके भेट दिली. त्यानंतर जेव्हा जेव्हा अमरावतीला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व्हायच्या तेव्हा तेव्हा तिने त्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेमध्ये भाग घेतला. तिने सातवीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. तिच्या आजूबाजूला साधारणता मजूर वर्ग सामान्य कुटुंबातील लोक राहतात. घरात पुरेशी जागा नाही. अभ्यासाचे वातावरण नाही पण त्या परिस्थितीवर मात करून तिने युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून अमरावती शहराचे नाव मोठे केले.

अभ्यासादरम्यान या आल्या अडचणी…

पल्लवी जिथे राहते तेथील स्थिती विपरीत आहे. टेकडी जवळच वडाळी तलाव आहे. येथून गेलेल्या महामार्गावरून सतत ट्रकची ये- जा असते. त्यामुळे अभ्यासादरम्यान सतत व्यत्यय येतो. या परिस्थितीवर मात करून आज पल्लवी यूपीएससीची परीक्षा पास झाली आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने वडील देवीदास चिंचखेडे यांना दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पल्लवीचे शिक्षण…

पल्लवीने अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर तिने एका खाजगी कंपनीमध्ये तीन वर्ष नोकरी केली. परंतु त्यामध्ये तिचे मन रमले नाही. त्यानंतर तिने नोकरीचा राजीनामा देत समाज कल्याण विभागाच्या बार्टी या शासकीय सामाजिक संस्थेच्या सहकार्याने आपले केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएएस या परीक्षेची तयारी पूर्ण केली.