लोकसत्ता टीम

नागपूर: ‘राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थे’द्वारा(एसआयएसी) देण्यात येणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२५ च्या नि:शुल्क परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना २८ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर सामायिक लेखी प्रवेश परीक्षा ४ ऑगस्ट २०२४ ला होणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबईच्या संचालिका डॉ. स्वाती वाव्हळ यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली.

केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा २०२५ च्या परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता पूर्णपणे विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व भारतीय प्रशासकीय पूर्व प्रशिक्षण केंद्रे नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद व कोल्हापूर येथील प्रवेश परीक्षेसाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या जाहिरातीत नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून http://www.siac.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

आणखी वाचा-ताटातूट झाल्याने अस्वस्थ असलेल्या मादी बिबट्यानं अखेर बछड्यास ताब्यात घेऊन…

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची स्थापना सन १९७६ साली झाली असून महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांचा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत टक्का वाढावा, या उदात्त हेतूने करण्यात आली. ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येते. सन १९७६ पासून आजतागायत संस्थेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळविले आहे. संस्थेत प्रशिक्षण घेतलेले शेकडो विद्यार्थी देशातील वेगवेगळ्या राज्यात व परदेशात भारतीय प्रशासकीय सेवेत सनदी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नि:शुल्क नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण २०२५ च्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्जाचा अंतिम दिनांक- २८ जूनपर्यंत.
परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक- ३० जून.

आणखी वाचा-विदर्भात १ जुलैला वाजेल शाळेची पहिली घंटा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेखी प्रवेश परीक्षा दिनांक- ०४ ऑगस्ट.

  • विद्यार्थ्यांचे प्रवेश लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील एकुण गुणांच्या आधारे ठरवले जाणार आहे.
  • मुलाखतीचे वेळापत्रक परीक्षेनंतर जाहीर केले जाईल.
  • सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पोर्टलवर लॉग इन करून पसंतीचे प्रशिक्षण केंद्र प्रवेशासाठी निवडावे.
  • प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती वैयक्तिकरित्या उपलब्ध करून दिली जाणार नाही.
  • प्रवेश प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ‘एसआयएसी’च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल.
  • सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता, ऑनलाईन अर्ज भरण्याविषयी सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे.