वर्धा: वसतीगृहात किंवा निवासी शाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पोषक भोजन मिळण्याची बाब सर्वात महत्वाची मानल्या जाते. परंतू तरीही अश्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याच्या घटना घडत असल्याचे लपून नाही. त्याची प्रशासन पातळीवर गंभीर दखल घेतल्या जाते. पण अशी विषबाधा घडण्याची बाब नेहमी घडणे व धाक दाखवून ती दडपण्याचा प्रकार होत असेल तर मग विद्यार्थ्यांनी करायचे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच झाले. पण विद्यार्थ्यांना वारंवार असे नासके अन्न देण्याचा प्रकार सहन नं झालेल्या एका सहृदय व्यक्तीने अखेर यास वाचा फोडली आणि सगळेच हादरले.
वर्धेलगत सेलू काटे येथील नवोदय विद्यालयात झालेला हा प्रकार या व्यक्तीने खासदार अमर काळे यांना निनावीपणे कळविला आणि बिंग फुटले. खासदार काळे यांना ही माहिती कळताच त्यांनी तडक नवोदय गाठले. पाय ठेवताच दिसलेला गलिच्छपणा संताप आणणारा ठरला. प्रथम त्यांनी विषबाधा झालेल्या मुलांची भेट घेतली. तब्येत गळून गेलेल्या या मुलांची अवस्था पाहून त्यांनी अन्न व औषधी प्रशासनास फोन करीत पाचारण केले.
अन्न नमुने घेण्याचे निर्देश दिले. तसेच आरोग्य विभागास सूचित करीत डॉक्टरांची चमू बोलावली. एका बाल विद्यार्थ्यांची अवस्था पाहून तर खा. काळे यांच्या डोळ्यात पाणीच आल्याचे एका उपस्थिताने सांगितले. विषबाधा होण्याचे प्रकार अनेकदा घडल्याच्या तक्रारी आल्याचे नमूद करीत त्यांनी व्यवस्थापनास खडसावलेही. अश्या विविध तक्रारी पूर्वीच आल्यात. तेव्हा फोनवर सुधारणा करण्याची तंबी दिली होती. पण तरीही बदल नं झाल्याने व तक्रारी सुरूच असल्याने ही भेट द्यावी लागल्याचे काळे सांगतात.
भविष्यात अश्या तक्रारी यायला नको, अन्यथा संसदेत ही बाब उपस्थित करावी लागेल, असा ईशारा खा. काळे यांनी दिला. अपेक्षित ते बदल करीत विद्यार्थ्यांना जपा, असा सल्लाही त्यांनी दिला. केंद्राकडून मिळणारा निधी योग्यप्रकारे उपयोगात आणा, अशी सूचना पण त्यांनी केली. जवाहर नवोदय विद्यालय हे केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातर्फे स्थापित नवोदय विद्यालय समिती संचालित करते. ते स्वायत्त आहे.
ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना निवासी शिक्षण देण्यासाठी हे केंद्रीय विद्यालये स्थापन करण्यात आले. ग्रामीण भागातील गुणवत्ता विकसित करण्यासाठी व त्यांना शहरी समकक्ष विदयार्थ्यांच्या तोडीस सक्षम करण्याहेतून शिक्षण दिल्या जाते. पात्रता परीक्षेच्या माध्यमातून निवडलेल्या विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, गणवेश, शालेय साहित्य व अन्य मदत या ठिकाणी दिल्या जात असते.