नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ऐतिहासिक अशा विजयादशमी उत्सवासाठी सज्ज झाला आहे. रविवारी शहराच्या तीन भागातून पथसंचलन करण्यात आले. मागील शंभर वर्षात संघाने अनेक चढउतार पाहिले व संघाचे स्वयंसेवक आज देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले आहेत. मात्र संघाची सुरुवात अतिशय शांतपणे झाली होती. संघ स्थापनेच्य वेळी डॉ. हेडगेवार यांनी कुठलीही कार्ययोजनादेखील मांडली नव्हती. शताब्दी वर्षानिमित्त संघाच्या अनेक आठवणींना उजाळा देताना आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा गणवेशातील पहिला फोटो समोर आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रेम करणाऱ्या देशाने जगातील लाखो स्वयंसेवकांसाठी हे आकर्षणाच्या मी प्रेरणेचे क्षण आहे.

शताब्दी वर्षात प्रवेश करत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी शनिवारी सायंकाळी ऐतिहासिक पथसंचलन काढले. यात स्वयंसेवकांच्या शिस्त व लयबद्धतेचे नागपूरकरांना दर्शन झाले. विशेष म्हणजे संघ स्थापनेपासून प्रथमच विजयादशमीचे पथसंचलन एकाच वेळी तीन ठिकाणांहून निघाले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील पथसंचलनाचे अवलोकन करण्यासाठी पोहोचले. याशिवाय विविध ठिकाणी हजारो स्वयंसेवकांवर पुष्पवर्षा करत पथसंचलनाचे स्वागत करण्यात आले. इंग्रजी कॅलेंडरनुसार २७ सप्टेंबर रोजी संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर, पहिल्यांदाच दोन ऐवजी तीन ठिकाणांहून मोर्चा सुरू झाला. एरवी विजयादशमीच्या सकाळी मुख्य कार्यक्रमापूर्वी दोन गटात पथसंचलन व्हायचे. मात्र, यावेळी शताब्दी वर्षानिमित्त तीन ठिकाणांहून पथसंचलन निघाले. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कस्तुरचंद पार्क, यशवंत स्टेडियम व अमरावती मार्गावरील हॉकी मैदानावरून स्वयंसेवक निघाले. ७:३५ च्या सुमारास तीनही पथसंचलन सीताबर्डी येथील व्हेरायटी चौकात एकाच वेळी पोहोचले. यावेळी घोष पथकानेही स्थानिक रचना सादर करून लोकांची मने जिंकली.

संघाच्या गणवेशात कसा बदल होत गेला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या पारंपारिक गणवेशात काही वर्षांपूर्वी बदल केला आहे. संघ स्वयंसेवक आता खाकी हाफपँटऐवजी तपकिरी रंगाची फुलपँट परिधान करतात. १९२५ साली संघाची स्थापना झाल्यापासून खाकी हाफपँट संघाची ओळख होती. खाकी हाफपँट सोडली तर, संघाच्या गणवेशात वेळोवेळी बदल झाले होते. संघाच्या स्थापनेपासून खाकी शर्ट आणि खाकी पँट संघाचा गणवेश होता. याच गणवेशात डॉ हेडगेवार यांचा फोटो आहे. यात त्यांनी फेटाही घातला आहे. सोबत हातात एक काठी आहे. संघामध्ये १९४० मध्ये खाकी शर्टच्या जागी सफेद शर्टाचा वापर सुरु झाला. १९७३ मध्ये संघाच्या गणवेशामध्ये लेदर बुटांचा वापर सुरु झाला. त्यानंतर रेक्सिन बूट वापरण्यालाही परवानगी देण्यात आली होती.