चंद्रपूर : दिल्लीवारी करून परत येताच राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर लोकसभा मतदार संघात येणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी, पांढरकवडा, केळापूर येथे भरगच्च कार्यक्रम करून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लोकसभेसाठी तयार रहा हा संदेश दिला. विशेष म्हणजे मुनगंटीवार यांनी पांढरकवडा येथे भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून लोकसभेच्या लढाईसाठी तयार असल्याचा संदेश दिला.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघासाठी माजी गृहमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर प्रयत्नशील आहेत. तर वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाने आदेश दिल्यानंतरच लोकसभेच्या रिंगणात उतरणार अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान अहीर व मुनगंटीवार यांनी गुरूवारी दिल्लीवारी केली. अहीर दिल्ली येथेच मुक्कामी आहे तर मुनगंटीवार आज सकाळच्या विमानाने नागपुरला परत आले आणि लोकसभा मतदार संघात कार्यक्रमांचा धडाका सुरू केला आहे.

हेही वाचा…चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात,”भाजपलाही एक पाय मागे घ्यावा लागू शकतो”

चंद्रपूर जिल्ह्यात मुनगंटीवार यांनी नुकताच ताडोबा महोत्सव, ॲडव्हांटेज चंद्रपूर, सांस्कृतिक महोत्सव, जाणता राजा महानाट्य तसेच राम मंदिर उद्घाटना प्रसंगी विशेष कार्यक्रम आयोजित केले होते. यापूर्वी मुनगंटीवार यांनी कधीही यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी या दोन विधानसभा मतदार संघात कार्यक्रम आयोजित केले नाही. मात्र दिल्लीवारी करून येताच आज वणी या तालुक्याच्या ठिकाणी महादेव वन उद्यान भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले. तसेच केळापूर येथे जगदंबा संस्थानच्या नविन भक्तनिवास लोकार्पण समारंभाला उपस्थिती दर्शविली.

विशेष म्हणजे मुनगंटीवार यांच्या हस्तेच या भक्तनिवासाचे लोकार्पण झाले. त्या पाठोपाठ पांढरकवडा येथील शासकीय निवासस्थानी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक लावून लोकसभा निवडणुकीच्या नियोजनाचे सांगितले. तर पांढरकवडा येथेच समीर मुस्तिलवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. एकूणच दिल्लीवारीनंतर मुनगंटीवार लोकसभा क्षेत्रात अधिक सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. वणी व पांढरकवडा येथील कार्यक्रमांची आखणी ही लोकसभा निवडणुकीची तयारी असल्याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हेही वाचा…शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. ” महायुतीचे जागा वाटप मनासारखे  होईल असे नाही पण..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेव्हा जेव्हा मी जिंकलो, पक्ष जिंकला, पक्षाचे विचार जिंकले – हंसराज अहीर

मी चंद्रपूर लोकसभा १९९६ मध्ये पहिल्यांदा जिंकलो. १९९१ च्या निवडणुकीमध्ये भाजपा तिसऱ्या क्रमांकावर होता त्यानंतर एकूण ४ वेळा जिंकलो. माझ्या मूळ जातीची फक्त १५० परिवार असतील तरी पण पक्षाने मला वारंवार उमेदवारी दिली, ४ वेळा विजय झाला . ही माझ्या पक्षाची व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील जनतेची महानता आहे. मी लोकसभा जिंकलो तेव्हा पक्ष जिंकला, पक्षाचे विचार जिंकले, लोकशाहीचा विजय ठरत होता, संविधानाचा सन्मान होत होता. निवडणूक ही विचारांची असते. पुढेही लोकशाहीला हेच अभिप्रेत आहे. मी चारित्र्य सांभाळले, जनतेच्या मताचा आदर केला. ही निवडणूक सुद्धा पक्ष जिंकेल. चंद्रपूर भाजपचा गड आहे. दुर्देवाने मागची निवडणूक आम्ही जिंकलो नसलो तरी आमची एकता, एकाग्रता पक्ष बांधणीतून आम्ही विजयाकडे चाललो आहे. आताही आम्हीच जिंकू असेही अहीर म्हणाले.