लोकसत्ता टीम

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वांत जास्त वाघ असणाऱ्या ताडोबाचा ‘मन की बात’मध्ये उल्लेख केला. आता जिल्ह्यातील वाघांचे प्रतिनिधित्व करीत, ‘आम्ही मागास नाही’, अशी डरकाळी लोकसभेत फोडायची आहे, असा निर्धार व्यक्त करीत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांना भावनिक साद घातली.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुनगंटीवार यांनी आशीर्वाद सभेच्या माध्यमातून चंद्रपूरकरांशी संवाद साधला. मंचावर आमदार संजय रेड्डी बोदकुलवार, संदीप धुर्वे, अशोक उईके, भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, शहराध्यक्ष राहुल पावडे, ज्येष्ठ नेते चंदेल सिंग चंदेल उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले, जातीच्या आधारावर ज्या दिवशी मतदान होईल, त्या दिवशी देशासाठी लढणाऱ्यांचा अपमान होईल. त्यामुळे विकासावर मते मागणाऱ्यांचे मी स्वागत करतो. “मौसम टूटना नहीं चाहिए, विकास रुकना नहीं चाहिए,” असा नारा देत ‘मी संसदेत जाईल तेव्हा महाराष्ट्राचा आवाज देशभर पोहोचवण्याचे कार्य करेन.

आणखी वाचा- सावधान! महिलांना मसाज व अन्य सेवा देण्यासाठी ‘जिगोलो’ बनण्याचे आमिष, सायबर गुन्हेगारांचा अफलातून फंडा

हे कार्य करत असताना चंद्रपूर-वणी-आर्णी हा आघाडीचा लोकसभा मतदारसंघ व्हावा, यासाठी प्रयत्न करेन. देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोणी एखाद्या जातीचा प्रतिनिधी म्हणून लढला नाही. प्रत्येक जण भारतमातेचा सुपूत्र म्हणून लढले. ‘भारत माता की जय’ म्हणून लढले. जातीच्या आधारावर मतदान होणे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आहे. विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही, या सूत्रावरच मी काम करणार आहे. आर्णीतील बोरगाव हे आपले आजोळ आहे, तर वणीसोबतही आपले ऋणानुबंध आहे, याची आठवण मुनगंटीवार यांनी यावेळी करून दिली. यावेळी चंद्रपुरात केलेल्या विकास कामांचा आढावाही मांडला.