नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव यंदा अधिक उत्साहात साजरा होणार असून, नागपूरच्या रेशीमबाग मैदानात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन आणि मुख्य संबोधन होणार आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. या प्रसंगी देशभरातील वरिष्ठ स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, घाना, दक्षिण आफ्रिका, थायलंड, इंग्लंड आणि अमेरिका येथील काही नागरिक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विविध ठिकाणी हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. या उपक्रमाच्या माध्यमातून हिंदू समाजात जागरूकता आणि सशक्तीकरण यावर भर दिला जाणार आहे. विजयादशमी दिनाच्या पार्श्वभूमीवर संघाच्या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे पथसंचलन २८ सप्टेंबर रोजी दोन मार्गांवरून होणार आहे. पहिले पथसंचलन यशवंत स्टेडियम ते व्हरायटी चौक, तर दुसरे अमरावती रोडवरील हॉकी मैदान ते व्हरायटी चौक या मार्गांवरून होणार आहे. या पथसंचलनात शेकडो स्वयंसेवक पारंपरिक गणवेशात सहभागी होणार आहेत.
याशिवाय बाल स्वयंसेवकांचे स्वतंत्र पथसंचलनही आयोजित करण्यात येणार आहे. देशभरात सध्या संघाच्या सुमारे ८३ हजार शाखा नियमितपणे कार्यरत आहेत. याखेरीज आठवड्यातून एकदा होणाऱ्या ३२ हजार बैठकांद्वारे संघाची वैचारिक आणि सामाजिक चळवळ अधिक बळकट होत असल्याचे आंबेकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी विजयादशमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत संघाच्या भूमिका स्पष्ट केल्या. यावेळी नेपाळमधील झेंजी समाजाचे आंदोलन, तेथील सत्तांतर, तसेच भारतावर अमेरिकेने लावलेल्या टेरिफ शुल्कासह एच-१बी व्हिसाच्या वाढलेल्या शुल्काविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आले.
यावर उत्तर देताना आंबेकर म्हणाले, “संघ आणि स्वयंसेवक भारताच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहेत. आमचा उद्देश भारताला सशक्त करण्याचा आहे की, कोणत्याही देशात किंवा समाजात संकटं उद्भवू नयेत. जगातील कोणताही समाज दु:खात राहू नये, यासाठी प्रयत्नशील राहणे ही संघाची दिशा आहे.”
नेपाळमधील झेंजी समाजाच्या हालचालींवर थेट भाष्य टाळत त्यांनी म्हटले की, “हिंदू समाजाचे सशक्तीकरण हे केवळ भारतापुरते मर्यादित नाही, तर त्यामागे संपूर्ण जगाला दु:खातून मुक्त करण्याचा दृष्टिकोन आहे. जगभरात जे षड्यंत्र चालू आहे, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदू समाज संघटित व सजग होणे आवश्यक आहे.”
अमेरिकेच्या टेरिफ व एच१बी व्हिसा शुल्कवाढीमुळे भारतीयांवर होणाऱ्या परिणामाविषयी त्यांनी सांगितले, “ संघाचे प्रयत्न हे भारताला आत्मनिर्भर व सक्षम करण्याचे आहेत, जेणेकरून कोणत्याही बाह्य दबावाचा फारसा परिणाम होणार नाही.”