नागपूर : दिवाळीच्या काळात हिंदूंनी केवळ हिंदूंच्याच दुकानातून खरेदी करावी,असे वादग्रस्त विधान करणाऱे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, पण त्याने काही होणार नाही, त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी नागपूरमध्ये केली. नागपूर जिल्ह्यात एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सुळे सकाळी नागपूरमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला. आमदार संग्राम जगताप यांचे विधान दोन स माजात तेढ निर्माण करणारे आहे. देश कोणाच्या मर्जीने नव्हे तर संविधानाने चालणार आहे, त्यामुळे त्यांना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावून चालणार नाही तर त्यांची पक्षातून हकालपट्टी करा,असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कर्ज माफी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची हमी दिली होती, आता शेतकरी संकटात आहे, त्यांना संकटकाळात कर्जमाफीची गरज आहे, पण सरकार त्यांचे आश्वासन पूर्ण करीत नाही,आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,आणि सरकारलाही स्वस्थ बसू देणार नाही,असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या कोंढाळी येथे पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी कोंढाळी दौऱ्यावर होत्या. सकाळपासूनच कोंढाळीत कार्यकर्त्यांची गर्दी होती. यावेळी पक्षाचे प्रवक्ते प्रविण कुंटे पाटील, सलील देशमुख, नगर पंचायतीचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा आघाडी व तालुकाभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.. यावेळी खा. सुळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.सोयाबीनला योग्य बाजारभाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
त्यातच निकृष्ट दर्जाच्या फवारणी औषधांमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाले आहे, अशी व्यथा कार्यकर्त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. सुळे यांनी याबाबतीत चौकशी करून कंपन्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करू,अशी हमी दिली. त्या म्हणाल्या “शेतकरी आज अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडला आहे. राज्य सरकारने दिलेली संपूर्ण कर्जमुक्तीची (सातबारा कोरा) हमी पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांची स्थिती अधिक बिकट झाली आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणे हा त्यांचा हक्क आहे. कर्जमाफी करवून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि सरकारलाही स्वस्थ बसू देणार नाही. शेतकऱ्यांचे अश्रू आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही ती आमची जबाबदारी आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने एकदिलाने लढवाव्यात, जनतेचा विश्वास, विकासाची काम आणि प्रामाणिक नेतृत्व हेच आपल्या विजयाचे सूत्र आहे, असे सुळे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.याप्रसंगी सलील देशमुख यांचे भाषण झाले. यावेळी सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.