सूरजागड पहाडावर सुरू असलेले लोहखनिजाचे उत्खनन वाढवण्यासाठी २७ ऑक्टोबरला गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्तावित पर्यावरणविषयक जनसुनावणीकरिता प्रभावित होणाऱ्या गावातील निवडक नागरिकांना नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील सुशिक्षित तरुणांनी या जनसुनावणीवर प्रश्न उपस्थित केले आहे. सोबतच या भागातील अनेकांना पोलीस विभागाकडून १४९ अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन दबावतंत्राचा वापर करीत असल्याचा आरोप देखील येथील युवकांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या सूरजागड लोहप्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आहे. येथील खाणीत सध्या सुरू असलेले उत्खनन १० दशलक्ष टन इतके वाढवण्यात येणार असल्याने एटापल्ली तालुक्यातील १३ गावे प्रभावित होणार आहे. त्याकरिता प्रदूषण मंडळाने येत्या २७ ऑक्टोबरला गडचिरोली येथे गावकऱ्यांचे आक्षेप व तक्रारी ऐकून घेण्याकरिता जनसुनावणी ठेवली आहे. मात्र, ही सुनावणी एटापल्ली येथे घेण्यात यावी याकरिता परिसरातील नेते व गावकरी आग्रही होते. परंतु, प्रशासनाने ही मागणी मान्य न करता गडचिरोली येथे जनसुनावणी ठेवली आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी नागरिक जिल्हा मुख्यालयी कसे जाणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावर कंपनीने काही वाहन उपलब्ध करून त्यांना नेण्याचे ठरवले असल्याचे कळते.

हेही वाचा :शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका; नाना पटोले यांचे आवाहन

यासाठी मागील महिनाभरापासून तालुक्यातील गावामध्ये बैठका घेणे. गावातील प्रतिष्ठितांसोबत सलगी वाढवून जनसुनावणी विनाअडथळा कशी पार पडेल याची खात्री करून घेणे व जे नागरिक विरोधात बोलतील, अशी शंका आल्यास त्यांना पोलिसांकडून नोटीस देत त्यांच्यावर दबाव निर्माण करणे हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाला नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यायचेच नसेल तर मग जनसुनावणीचा देखावा का उभा केला जातोय, असा प्रश्न या भागातील तरुणांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात एटापल्ली येथील उपविभागीय दंडाधिकारी शुभम गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ५१५ लोकांची यादी आल्याचे सांगितले. इतर प्रकाराबद्दल ठाऊक नसल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा :अमरावती: कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी

सध्या आमच्या भागात जे सुरू आहे, यावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही सुनावणी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ठेवली आहे की कंपनीच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी हेच कळायला मार्ग नाही. वाढीव उत्खननामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाने आदिवासींचे जीवन धोक्यात येईल. आज प्रशासनाने प्रत्यक्षात जाऊन पाहणी करावी तेव्हा त्यांना कळेल किती प्रमाणात जल प्रदूषण झाले असून शेतीचेही मोठे नुकसान होत आहे, असे गुरुपल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते अजय मडावी म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surjagad iron mine in gadchiroli pressure technique of administration for public hearing tmb 01
First published on: 26-10-2022 at 12:22 IST